शबनम न्यूज : तळेगाव / पुणे (दि.२६ एप्रिल) :- “आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तुमच्याकडे एकवेळ संपत्ती नसेल तरी चालेल पण गुणवत्ता असेल तर तुम्ही यशाचे शिखर सहजपणे पार करु शकता.” असे प्रतिपादन सध्या लंडन येथे एई कॉम या नामांकीत कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असणारे आणि मुळ तळेगावकर असलेले अभियंता नितीन कुल यांनी केले. निमित्त होते पु.वा.परांजपे विद्या मंदिर १९९७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन हॉटेल आमराई येथे पार पडलेल्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात अभियंता नितीन कुल बोलत होते. यावेळी अतिशय खडतर परीस्थितीतुन शिक्षण घेतलेल्या आणि कतार,लंडन आदी देशात आपल्या अभियांत्रीकी कौशल्याची छाप उमटवलेल्या नितीन कुल यांचा मानपत्र, शिवप्रतिमा देऊन माजी विद्यार्थ्यांकडुन आणि मैत्रस्पर्ष सोशल फाउंडेशन तर्फे विशेष सन्मान करण्यात आला.
पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य व माजी नगरसेवक संतोष भेगडे, उद्योजक व सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेचे संचालक सुनिल दाभाडे हे व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. संतोष भेगडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून मैत्रस्पर्श सोशल फाउंडेशनच्या मागील सात वर्षांतील सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. संस्थेतर्फे गरजु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व घेतले जाते याचाही उल्लेख त्यांनी मनोगतात केला. तसेच नितीन यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे असे मत व्यक्त केले. सुनिल दाभाडे यांनी नितिन कुल यांचा आदर्श नविन पिढीने घेतला पाहीजे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी युवा उद्योजक म्हणुन अल्पावधीतच यश मिळवणारे अमित वैद्य व पुणे महानगर नियोजन समितीवर सदस्य म्हणुन निवडुन गेलेले संतोष भेगडे यांचाही सन्मानचिन्ह प्रदान करून माजी विद्यार्थ्यांच्या वतीने गौरविण्यात आले;
नितिन कुल पुढे म्हणाले की, “अनेक मुले पैशाअभावी शिक्षण पुर्ण करत नाहीत. त्यांच्यात जिद्दिचा अभाव असतो. पण जर का तुमच्यात दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर या जगात काहीही अवघड नाही. शिक्षण पुर्ण करताना येणार्या अडचणींवर मात करणे हे जमले पाहीजे.परदेशातसुद्धा भारतीय शिक्षणाविषयी आदर आहे.” दैनंदिन जीवनातील प्रसंग आपल्या न शैलीतून कथन करीत नितीन कुल यांनी अंतर्मुख केले. कार्यक्रमाच्या संयोजनात तुषार खेरडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ओंकार वर्तले यांनी सूत्रसंचालन केले. गजानन घबाडे आभार मानले.