शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२७ एप्रिल) :- आपत्कालीन परिस्थितीत जोखीम पत्करून मानवी जीविताचे तसेच साधन संपत्तीचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाच्या आणि आपत्तीकाळात सुरक्षेचे काम करणाऱ्या पथकातील जवानांचे योगदान अभिमानास्पद असून ते समाजाचे खरेखुरे हिरो आहेत, असे प्रतिपादन आरोग्य व औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे सहसंचालक अखिल घोगरे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागाच्यावतीने आणि किंग्स एक्स्पो मिडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये आयोजित कार्यक्रमात अग्निशमन दल आणि आपत्तीकाळात सुरक्षेचे काम करणाऱ्या पथकातील जवानांना तसेच सामाजिक व्यक्तींना ‘सेफ इंडिया हिरो प्लस’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी अखिल घोगरे बोलत होते. या समारंभास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, बृहन्मुबई महानगरपालिकेचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी दिपक घोष, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, सिडकोचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय राणे, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शक कर्नल विश्वास सुपनेकर, किंग्स एक्स्पो मिडिया लिमिटेडचे संचालक डॉ. एन. के. गुप्ता यांच्यासह सिडको, पीएमआरडीए, महामेट्रो, महिंद्रा आणि टाटा मोटर्स आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सत्कारार्थीमध्ये सर्पमित्र विनायक बडदे आणि परिवार, महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, उपमुख्य अग्निशमन अधिकारी प्रताप चव्हाण, गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलातील जवान, सिडको अग्निशमन सेवा दलातील जवान, पीएमआरडीए अग्निशमन सेवा दलातील जवान, महामेट्रोचे आपत्ती विभागाचे कर्मचारी अधिकारी, महिंद्रा आणि टाटा मोटर्सच्या आपत्ती विभागाचे कर्मचारी अधिकारी यांना यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जोखीम पत्करून नागरी सेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणा-या जवानांचे कार्य प्रकाशझोतात येत नसते. ते इमाने इतबारे आपली सेवा बजावत असतात. त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली ही चांगली गोष्ट घडली आहे. आधुनिक काळात तर आपत्ती व्यवस्थापनाचे क्षेत्र अधिक आव्हानात्मक झाले आहे. विकासाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तसेच प्रशिक्षित मनुष्यबळाच्या आधारे आपण आपत्तींचा सामना करू शकतो. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देखील याविषयी माहिती आणि ज्ञान असले पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांना शिबीर अथवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले तर ते अधिक फायदेशीर ठरेल, असे सहसंचालक अखिल घोगरे यांनी यावेळी सांगितले. यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला आरोग्य व औद्योगिक सुरक्षा संचालनालयाच्या वतीने संपूर्ण सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, आपत्ती काळात काम करणाऱ्या व्यक्ती आणि जवानांना आज गौरविण्यात येत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. कोविड काळात आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व आता सर्वाना समजले आहे.त्यामुळे हा विषय प्रत्येकासाठी महत्व्वाचा आहे. नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपत्तीशी सामना करणाऱ्या यंत्रणा सक्षम करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्न करत आहे. काळाशी सुसंगत ठरेल असे व्यवस्थापन करण्यासाठी नागरी सहभागावर भर देण्यात येईल.शालेय विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून आपत्ती व्यवस्थापणाचे प्रशिक्षण देण्याची सूचना अंमलात आणण्यासाठी महापालिका नियोजन करेल. असेही ढाकणे यावेळी म्हणाले.
कर्नल सुपनेकर यांनी देशविदेशातील आपत्तीच्या घटना आणि त्याचे व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. महाराष्ट्रात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत समन्वय आणि व्यवस्थापन करण्याचे काम निरंतर सुरु आहे. पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर असून याठिकाणच्या आस्थापनांनी आपसात समन्वय ठेवावा.
यावेळी उंच निवासी वाणिज्य व मिश्र इमारती मधील अग्निशमन व बचाव उपायोजना, पीपीई, बीबीएस आणि औद्योगिक अग्निशमन सुरक्षा या विषयाबाबतच्या चर्चासत्रात विविध सहभागी संस्थांनी चित्रफित आणि संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच संबंधित क्षेत्रातील तज्ञांनी मार्गदर्शन केले. उंच इमारतीतील बांधण्याचे विविध नियम निकष कायदे प्रत्यक्षातील तांत्रिक आपत्ती निवारणातील अडचणी आणि त्यावरील उपाय योजना याविषयी सखोल चर्चा करण्यात आली.