शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव आळंदी या ठिकाणी “23 एप्रिल जागतिक इंग्रजी दिन” दिवसाचे औचित्य साधून इंग्रजी विभागाअंतर्गत ऑनलाइन एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळे अंतर्गत ” Improve Your English” या विषयावर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देताना महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. छाया जोशी यांनी इंग्रजी भाषेचे महत्व व काळाची गरज लक्षात घेऊन कार्यशाळेच्या विषयाची निवड करण्यात आली तसेच व्याख्यानातील मार्गदर्शन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले. पाहुण्यांचा परिचय करून देताना त्यांचयससाधे, अभ्यासू व चिकित्सक व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना “Dr. Anand Kulkarni as man of words and an ocean of knowledge.” असे वर्णन केले.
या कार्यशाळेचे उदघाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी इंग्रजी भाषा अवगत करण्यासाठी लिहिणे,वाचणे, ऐकणे व बोलणे ही चार कौशल्य महत्त्वपूर्ण असून जर भाषेला आपलेसे करायचे असेल तर वरील कौशल्यांचा सराव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ इंग्रजी भाषाच नाही तर मराठी व हिंदी या भाषेवर सुद्धा प्रभुत्व मिळवता आले पाहिजे असे मत व्यक्त करीत भाषा अवगत करताना त्या भाषेचा शब्द साठा जास्तीत जास्त वाढवून ती रोजच्या वापरात आणणे आधुनिक काळात नितांत गरजचे आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे डॉ. आनंद कुलकर्णी इंग्रजी विभाग प्रमुख – कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, पुणे यांनी 21 व्या शतकात इंग्रजी भाषेची गरज व त्याचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. कोणतीही भाषा शिकण्याची प्रक्रिया प्रवासा सारखी असून इंग्रजी भाषा शिकत असताना ती समजून घेणे, तिचा सराव करणे व दैनंदिन जीवनात वापरात आणणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणती भाषा शिकतांना तिच्यावर प्रेम करणे ती अंगीकृत करणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेच्या कौशल्यावर विवेचन करताना त्यांनी महाराष्ट्राची पार्श्वभूमी समोर ठेवून पंढरीच्या विठ्ठलाचे उदाहरण दिले. ज्याप्रमाणे विठ्ठलाचा सर्वत्र वास आहे त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेचे अस्तित्व सर्वत्र आहे असे मत मांडले. भाषा शिकताना चुका होतात पण त्या चुका दुरुस्त करून त्या भाषेवर कसे प्रभुत्व मिळवता येईल यावर विविध उदाहरणासह सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेसाठी प्रा. संजीव कांबळे, प्रा.शैला वाळुंज, प्रा, परमेश्वर भत्ताशे, प्रा. कैलास अस्तरकर ,प्रा.डॉ. रणजित कदम, प्रा. शाहूराज येवते,प्रा. विकास दिघे, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. सोनाली अभंग, प्रा. डॉ. राजू शिरसकर,श्री.प्रवीण भावे इत्यादी विभाग प्रमुख,सहाय्यक प्राध्यापक,महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच इतर राज्यातील प्राध्यापक, शिक्षक,संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यशाळेचे सूत्रसंचालन व स्वागत प्रा. विश्वनाथ व्यवहारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रविण डोळस यांनी मानले अशी माहिती प्रा. माणिक कसाब यांनी दिली.