शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी या ठिकाणी शारीरिक शिक्षण विभागा अंतर्गत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देताना करतांना प्रा. विकास दिघे शारीरिक शिक्षण संचालक यांनी क्रीडा स्पर्धेची रूपरेषा मांडताना दिनांक ०९/०५/२०२२ ते १२/०५/२०२२ या कार्यकाळात कबड्डी, व्हॉलीबॉल, चेस, खो -खो, कॅरम, क्रिकेट व थाळीफेक इत्यादी मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे असे मत व्यक्त करीत सर्व उपस्थित पाहुणे व विद्यार्थी यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व उदघाटक शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या प्रा. प्रतिमा लोणारी शारीरिक शिक्षण संचालक, हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, राजगुरुनगर पुणे, यांनी पदवी शिक्षण घेत असताना आयुष्यातील तीन ते पाच वर्षे कोणत्याही मैदानी खेळासाठी कष्ट करा असे मत व्यक्त करीत शिक्षण पूर्ण करताना आरोग्य सुद्धा जपले पाहिजे असा संदेश महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना देऊन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना राहुल कोळपे पोलीस उपनिरीक्षक, पुणे यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना खरे अस्तित्व दाखवण्याची वेळ असते असे मत व्यक्त करीत स्वतःला खऱ्या अर्थाने सिद्ध करणे म्हणजेच जीवन होय. या स्पर्धेच्या युगात संघर्षा शिवाय कोणतेच ध्येय साध्य होत नसून त्यासाठी मेहनतीची गरज असते असे विचार व्यक्त केले. शिक्षण घेत असताना अपयश हे येत असते परंतु त्या अपयशाला यशात बदलण्याची ताकत केवळ तरुण विद्यार्थ्यांमध्येच असते असे मत व्यक्त करीत विविध उदाहरणासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हंसराज थोरात यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयीन पातळीवर शारीरिक शिक्षण विभाग अनिवार्य केला असून या विभागाचा उद्देश व ध्येय काय आहे यावर भाष्य करीत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आपले आरोग्य जपण्यासाठी कोणता तरी एक खेळ खेळला पाहिजे आणि हे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कर्तव्य असून शिवछत्रपती अवॉर्ड विजेत्या प्रा. प्रतिमा लोणारी यांच्या सारख्या कार्यकर्तृत्वाची विद्यार्थ्यांना गरज आहे असे मत व्यक्त केले. या मैदानी क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला कबड्डी संघाचे पंच दिपक गायकवाड , आदित्य लोखंडे व राजकुमार महारनवर लेखक आणि महाविद्यालयातील प्रा. माणिक कसाब, प्रा. संजीव कांबळे,प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ,प्रा.शैला, प्रा. कैलास अस्तरकर प्रा. शाहूराज येवते,प्रा. शैला वाळुंज, प्रा.डॉ. रणजित कदम,प्रा.. यशोदा खुळखुळे, प्रा. सविता मानके, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. सोनाली अभंग, प्रा. विश्वनाथ व्यवहारे,प्रा.प्रविण डोळस, प्रा. डॉ. राजू शिरसकर, श्री. प्रवीण भावे इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी मानले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.