शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात संशयास्पद वस्तू आढळून आली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर तीन जिलेटिन च्या कांड्या सापडल्या आहेत. तरी त्या निकामी करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. पुणे शहर पोलिस आणि रेल्वे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व निकामी पथकांनी (बीडीडीएस) शुक्रवारी कारवाई केली. पुणे शहर पोलीस आणि शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी)चे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पुणे रेल्वे स्थानकावर संशयास्पद गोष्ट सापडल्याची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सामान्यपणे दुपारी पुणे रेल्वे स्थानकात गजबजाट असणारे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामे करण्यात आलेत. प्रवाशांना सध्या तरी तेथे प्रवेश दिला जात नाहीय. जी संशयास्पद वस्तू आढळून आलेली ती जवळच्या मैदानात नेण्यात आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच प्लॅटफॉर्मवरील वाहतूक थांबवण्यात आलीय.
जीआरपीचे पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील म्हणाले, “पुणे रेल्वे स्थानक परिसरात एक संशयास्पद वस्तू आढळून आली. पुणे आणि रेल्वेचे BDDS पथके घटनास्थळी आहेत आणि आवश्यक तपास करत आहेत. ती फटाक्यासारखी वस्तू असल्याचे दिसते. आम्ही त्याचा शोध घेत आहोत.”
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पुणे रेल्वे विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ही वस्तू सापडली आणि त्यानंतर रेल्वे संरक्षण दलाने (RPF) शहर पोलिसांना माहिती दिली आणि त्यांनी ती वस्तू सुरक्षित केली आणि ती काढून घेतली.