शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
मागील वर्षी जून महिन्यात अधिसूचना क्रमांक TPM-1821/221/प्र क्र-43/2021 अनव्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण विसर्जित केले होते. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने भाडेपट्ट्याने वाटप केलेल्या भूखंडाची मालकी व ताबा हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे.परंतु त्याचे प्रत्यक्ष कामकाज हे ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेले होते.कोरोना महामारी मुळे व सुरवातीच्या काळात पुरेसा कर्मचारी वर्ग न उपलब्ध होऊ शकल्याने भूखंड व सदनिका हस्तांतरण प्रकरणे वेगवेगळ्या स्तरावर प्रलंबित होती.या दरम्यान १ एप्रिल २०२२ पासून हस्तांतरणाचे दर हे वाढले होते.व सदर प्रकरणावर कार्यवाही होत असताना त्याची आकारणी नवीन दरानुसार होत होती.याचा फटका प्राधिकरण वासीयांना होत होता.त्याबाबत पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आयुक्तांची भेट घेऊन सदर बाब निदर्शनास आणून दिली.जी प्रकरणे ३१ मार्च २०२२ अगोदर दाखल झालेली आहेत त्यांच्यावर जुन्या दराने हस्तांतरण फी आकारावी अशी मागणी आ अण्णा बनसोडे यांनी केली होती. आयुक्त राजेश पाटील यांनी सदर मागणी मान्य करत आज दिनांक १७ मे २०२२ रोजी परिपत्रक प्रसिद्ध करून प्रलंबित प्रकरणावर हस्तांतरण फी जुनीच लागू करावी असा आदेश दिला.यामुळे प्राधिकरण वासीयांचे लाखो रुपये वाचणार आहेत.आमदार अण्णा बनसोडे यांच्या सोबत प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश सोमय्या,सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे,मा नगरसेवक प्रसाद शेट्टी,मा महापौर आर एस कुमार यांनी यशस्वी पाठपुरावा करत प्रलंबित हस्तांतरण प्रकरणात जुने दर लागू करण्यास महानगरपालिकेला भाग पाडले.