शबनम न्युज | मुंबई
महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसामुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात घेण्यात याव्यात, अशी भूमिका राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने ज्या भागात पावसाची अडचण नाही, तेथे निवडणूक घेण्याबाबत विचार करावा, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी येत्या दोन आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तयारीदेखील सुरु केली आहे. मात्र जोपर्यंत ओबीसी आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत अशी भूमिका राज्य सरकारची आहे.
राज्यात २१ महानगरपालिका, २१० नगरपालिका, १० नगरपंचायती आणि १९३० ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रस्तावित आहेत. त्यामुळे आगामी काळात निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापणार आहे.