शबनम न्युज | देहूरोड
किवळे – विकासनगर येथील नेटके चौक ते शिंदे पेट्रोल पंप या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे भिजत घोंगडे अनेक वर्ष जैसे थे आहे. सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्याची मागणी युवा सेनेचे उपशहर अधिकारी राजेंद्र तरस यांनी केली आहे.
यासंदर्भात तरस यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ब क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. अनेक वर्ष होऊनही विकासनगर येथील नेटके चौक ते शिंदे पेट्रोल पंप या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. सध्या या मुख्य रस्त्यावरुन पीएमपीच्या बसेस तसेच अवजड वाहतूक सुरु असते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला आहे. काहीवेळा वाहतूक कोंडीही होत असते. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाला तातडीने प्रारंभ करावा .
रस्ता रुंदीकरणाबाबत जो भाग न्यायप्रविष्ट आहे तेथील रुंदीकरण न करता इतर रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि डांबरीकरणाचे काम सुरु करावे. हा रस्ता खासदार निधीतून सिमेंट काँक्रीटचा करण्याचा मानस आहे. त्यासाठी रस्ता रुंदीकरण करून द्यावा, अशी मागणी तरस यांनी निवेदनात केली आहे.