पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात प्रभाग क्रमांक १३ मधील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हणे वस्ती, हनुमान नगर या परिसरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने या भागातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख नेताजी काशीद व शिवसेनेचे संघटक भोसरी विभाग रावसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात सकाळी १० ते १२ या कालावधीत शिवसैनिक महिला भगिनींनी डोक्यावर हंडा घेऊन प्रशासन व भाजपच्या विरोधात निषेध व्यक्त करीत हंडा मोर्चा केला. पिंपरी-चिंचवड शहरात मागील पाच वर्षात भाजपची एक हाती सत्ता असताना या परिसरात पाण्याचा प्रश्न वेळोवेळी निर्माण झाला आहे. सत्ताधारी व प्रशासन यांना वेळोवेळी निवेदने देऊनही पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत असल्याने हा हंडा मोर्चा काढण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी सांगितले कि, भारतीय जनता पार्टीने महानगरपालिका वतीने पिण्याचे पाणी बांधकाम व्यवसायिकांना दिल्याने आमच्या परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. तसेच लवकरात लवकर ही पाणीटंचाई दूर करावी, सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी प्रशासनाकडे मागणी केली. तर रावसाहेब थोरात यांनी सांगितले कि, टँकर लॉबी बंद करा व स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा सुरू करावा नाही तर येत्या पुढील काळात यापेक्षाही मोठे तीव्र आंदोलन केले जाईल. या हंडा मोर्चात या प्रभागातील अनेक महिला उपस्थित होत्या. त्याचबरोबर शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, जनाबाई गोरे, साधना काशिद, तळेकर अनिता, सांगडे तुलशी, पल्लवी हेपट , आशाताई भालेकर, कल्पना शेटे, थोरात सुषमा व या भागातल्या अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सदर मोर्चामध्ये सूत्रसंचालन संजय गाढवे यांनी केले.