शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महापालिकेच्या वतीने “प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड” अभियानाअंतर्गत ‘क’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात आज प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या क क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील मोहिमेमध्ये सहाय्यक आयुक्त तथा स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, सहाय्यक आरोग्य अधिकारी बाबासाहेब कांबळे, सतीश पाटील यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयातील सर्व विभागांचे प्रमुख, आरोग्य विभागाचे कर्मचारी, डीव्हाईन संस्था, बेसिक्स संस्था यांचे स्वयंसेवक, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा भोर आदींसह नागरिक उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने शहरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दि.२५ मे ते दि.५ जून २०२२ या कालावधीत “प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड” ही मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शहरात प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्लॉगेथॉन मोहिमे अंतर्गत प्लास्टिक कच-याचे संकलन करण्याचे काम शहरात सुरु झाले आहे.
‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत भारत माता चौक ते मोशी टोल नाका, कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते वखार महामंडळ, आर.टी.ओ. रस्ता, टाटा मटेरियल गेट ते वेअर हाऊस रस्ता याठिकाणी प्लॉगेथॉन मोहिम पार पडली. यावेळी रस्त्यालगत असलेला प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला.
‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत वाकड ब्रिज ते हॉटेल टीप-टॉप कडे दोन्ही सर्व्हिस रस्त्यालगत प्लॉगेथॉन मोहिम राबवून रस्त्यालगत असलेला प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. तत्पूर्वी प्लॉगेथॉन मोहिमांच्या ठिकाणी एकदाच वापरात येणारे प्लास्टिक न वापरण्याची आणि शहर स्वच्छ तसेच सुंदर ठेवण्याची शपथ घेण्यात आली. वाकड येथील मोहिमेत बेसिक्स संस्थेच्या वतीने प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात आले.
शहरात प्लास्टिक मुक्त शहर मोहिमेंतर्गत दि. २८ मे रोजी ‘ई’ आणि ‘फ’ तसेच दि. २९ मे रोजी ‘ग’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटना, नागरिक यांच्या सहभागातून प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच ४ जून २०२२ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत “रिव्हर प्लॉगेथॉन” मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये पवना नदीमध्ये सांगवडे (किवळे) ते संगम येथे, मुळा नदीमध्ये वाकड ते संगम येथे, इंद्रायणी नदीमध्ये तळवडे ते चऱ्होली येथे “रिव्हर प्लॉगेथॉन” मोहिम आयोजित करण्यात आली आहे.
“प्लास्टिक मुक्त पिंपरी चिंचवड” या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.