शबनम न्युज | पिंपरी
एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस स्टेशनच्या वतीने औद्योगिक परिसरातील विविध औद्योगिक संघटना व वाहतूक संघटना यांच्या समस्यांचे निराकरण करणे करिता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांचे बरोबर चर्चा सत्राचे आयोजन केले होते. या चर्चा सत्रासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त अंकुश शिंदे साहेब, उपायुक्त मंचर इप्पर साहेब, सहाय्यक आयुक्त सागर कवडे साहेब, भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील तसेच पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक संजय सातव,विजय खळदकर, प्रमोद राणे, विनोद मित्तल तसेच स्विकृत संचालक सुनील शिंदे, माणिक पडवळ, अनिल कांकरिया, राजू देशपांडे, विजय भिलवडे, रमेश होले, सचिन पाटील उपस्थित होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी उद्योजकांना जाणवत असलेल्या विविध समस्या मा.पोलीस आयुक्तां समोर मांडून त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
१. औद्योगिक परिसरात वाढलेल्या चोऱ्यांबाबत :-
पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील तळवडे, सोनवणेवस्ती, कुदळवाडी, चिखली, शांतीनगर, प्राधिकरण सेक्टर ७ व १० तसेच एम.आय.डी.सी. भोसरी, पिंपरी, चिंचवड या औद्योगिक परिसरात चोऱ्याचे प्रमाणात वाढ झालेली असून चोरटे गटागटाने येऊन सुरक्षा रक्षकाला प्राणघातक हत्याराचा धाक दाखवून चोरी करतात, सुरक्षा रक्षक निशस्त्र असल्यामुळे प्रतिकार करू शकत नाही. पोलीस उद्योजकांनाच सी.सी.टी.व्ही. बसवा, सुरक्षारक्षक ठेवा असा सल्ला देतात. वरील औद्योगिक परिसरातील बहुतांश उद्योजकांनी आपापल्या कंपनीमध्ये सी.सी.टी.व्ही.बसविलेले असून सुरक्षारक्षक देखील ठेवलेले आहेत, परंतु ज्या कंपन्यांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत त्या कंपन्यांनी संबधित पोलीस स्टेशनला सी.सी.टी.व्ही.फुटेज देऊन देखील अद्याप पर्यंत चोरांचा किवा चोरी झालेल्या मालाचा पोलिसांना तपास लागलेला नाही.
2. अट्टल गुन्हेगार चोरांवर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाय करणेबाबत : –
पोलीस दप्तरी औद्योगिक परिसरात चोऱ्या करणाऱ्या ज्या अट्टल गुन्हेगाराची नोंद आहे, त्यांच्यावर कायमस्वरूपी कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली पाहिजे. औद्योगिक परिसरात महिला कामगार वर्ग देखील कामाला आहे. या चोरांकडून महिला वर्गाची छेड-छाड केली जाते. त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्याची चोरी केली जाते. या चोरट्यामुळे महिला कामगारांना ओव्हर टाईमला थांबवू शकत नाही व महिला देखील ज्यादा वेळ कामावर थांबत नाही. तसेच पुरुष कामगारांना अडवून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल काढून घेतले जातात, त्यांना मारहाण केली जाते. त्यामुळे कामगारांच्या कामावर येण्याच्या व घरी जाण्याच्या वेळेत पोलीस पथकांनी गस्त घालण्याची व्यवस्था केली पाहिजे.
3. अनाधिकृत माथाडी कामगार संघटना बाबत : –
लघुउद्योग हे माथाडी कामगार कायद्याच्या कक्षेत येत नसतांनाही औद्योगिक परिसरात स्वयंघोषित अनाधिकृत माथाडी कामगार संघटना या त्यांचे कामगार कामावर ठेवा व प्रोटेक्शन मनी देण्यासाठी उद्योजकांना नाहक त्रास देत असतात. या सर्व प्रकारामुळे येथील उद्योग बंद अथवा स्थलांतरित करण्याच्या मनस्थितीत या परिसरातील उद्योजक आले आहेत. कंपनीमध्ये चोरी व इतर त्रास होईल या भीतीने उद्योजक तक्रार करण्यास पुढे येत नाही.
४. अनाधिकृत भंगार खरेदी करणाऱ्या दुकानाबाबत.
वरील सर्व औद्योगिक परिसरातील चोरीला गेलेले भंगार हे त्या परिसरातील अनाधिकृत भंगार खरेदी करणाऱ्या दुकानातच विकले जाते. या अनाधिकृत भंगार खरेदी करणाऱ्या दुकानाचा शोध घेउन त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर होणाऱ्या चोऱ्यांना थोड्याफार प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल.
५. तळवडे, चिखली औद्योगिक परीसरातील वाहतूक कोंडीबाबत.
तळवडे व चिखली औद्योगिक परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी सकाळी कंपन्या चालू होण्याच्या वेळेस व संध्याकाळी कंपन्या सुटण्याच्या वेळेस होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य ते पोलीस बळ उपलब्ध करून देऊन या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे.
मा.पोलीस आयुक्तांनी वरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केल्यानंतर उत्तर देतांना संबधित पोलीस अधिकाऱ्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश देऊन उद्योजकांच्या या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.