शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रभागातील प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार दि. ३ जून रोजी संपन्न होणार आहे.
या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याची सुरुवात दि. ३ जून रोजी सकाळी साडेसात वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्ष (सीएसआर) सेलच्या उद्घाटनाने होणार आहे. खाजगी संस्था आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नव्या योजना कल्पना तसेच कार्यक्रमाच्या माध्यमातून शहराच्या शाश्वत विकासात अधिकाधिक भर घालण्याच्या उद्देशाने सीएसआर सेल सुरु करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा ऑनलाईन कार्यप्रणालीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनांमध्ये महिला व बालकल्याण योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, दिव्यांग कल्याणकारी योजना तसेच इतर कल्याणकारी योजनांचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड शहरात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी मोटार सायकल हे प्रभावी माध्यम आहे. पोलीस पेट्रोलिंगसाठी ५० स्मार्ट मोटार सायकल्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या मोटार घेणेकामी ५० लाख ९६ हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. तसेच यावेळी ग्रीन मार्शल पथकासाठी हेल्ड डिव्हाईसचे वाटप करण्यात येणार आहे.
मनपा क्षेत्रातील अरुंद रस्ते, मार्केट परिसर तसेच दाटीवाटीच्या गल्लीबोळांच्या ठिकाणी तातडीने सहजपणे पोहोचून अधिक प्रभावी अग्निशमन सेवा देण्यासाठी फायटर मोटार सायकल्स अत्यंत उपयोगी आहेत. अशा ६ फायटर मोटार सायकल्सचे वाटप अग्निशमन विभागाला यावेळी करण्यात येणार आहे. या मोटर सायकल्स खरेदीकामी ८० लाख ८८ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.
कासारवाडी येथील सी.एम.ई. चे आर्मी रोईंग नोड, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग यांच्यामार्फत मनपा क्षेत्रातील खेळाडूंना रोईंग प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे मनपा परिसरातील राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. उपमुख्यमंत्री पवार या रोईंग प्रशिक्षणाचे उद्घाटन तसेच पाहणी सकाळी ८.३० वाजता करणार आहेत.
भोसरी मधून आळंदीकडे जाणा-या मुख्य रस्ता बाजार पेठेतून जात असल्यामुळे याठिकाणी वाहनांना पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या समस्येवर मात करण्यासाठी प्रभाग क्र. ५ मध्ये सखुबाई गवाजी गवळी उद्यानात महापालिकेच्या वतीने बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या वाहनतळाचे भूमिपूजन सकाळी ९.१५ वाजता करण्यात येणार आहे. १४ हजार सहाशे बत्तीस चौरस मीटर जागेत उभारण्यात येणाऱ्या या वाहनतळासाठी ७ कोटी ८७ लाख ६३ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
भविष्यात होणाऱ्या आॅलिंपिक स्पर्धांच्या अनुषंगाने तसेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याच्या उद्देशाने नेहरूनगर येथे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम याठिकाणी पिंपरी चिंचवड आंतराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्रामार्फत हॉकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महापालिकेच्या या हॉकी अॅकॅडमीचे उद्घाटन सकाळी ९.४० वाजता संपन्न होणार आहे. तदनंतर उपमुख्यमंत्री पवार सकाळी १०.१० वाजता चिखली येथे उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन तेथील पाहणी करणार आहेत.
तळवडे गायरान येथे मातीचे पाथवे तयार करण्यात आले आहेत. येथे २ हजार दोनशे मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक, नागरिकांना बसण्यासाठी कट्टे, लँडस्केपिंग, हॉर्टीकल्चरल विषयक कामे करण्यात आली आहेत. तसेच तळवडे येथे नागरिकांसाठी उद्यान विकसित करण्यात आले आहे. एक एकरमध्ये विकसित करण्यात आलेल्या या उद्यानात ३०० मीटर लांबीचे जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी, लँडस्केपिंग, हॉर्टीकल्चरल विषयक कामे करण्यात आली आहेत. हे उद्यान विकसित करण्यासाठी तसेच इतर अनेक अनुषंगिक कामे करण्यासाठी १ कोटी २५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. नव्याने विकसित करण्यात आलेल्या या उद्यानाचे लोकार्पण सकाळी १०.४० वाजता करण्यात येणार आहे.
भक्ती शक्ती ते त्रिवेणीनगर चौकापर्यंत इको ट्रॅक तयार करण्यात येणार आहे या जॉगिंग ट्रॅकच्या कडेने विद्युत पोल उभारून तसेच वृक्षारोपण करून सुशोभित करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी, लँडस्केपिंगची कामे करण्यात येणार आहेत. ६ ते ८ मीटर रुंदीचे आणि १ हजार १०० मीटर लांबीचे मातीचे ट्रॅक तयार करण्यासाठी ९० लाख २७ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या जॉगिंग ट्रॅकचे भूमिपूजन सकाळी११.१० वाजता करण्यात येणार आहे.
थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अॅकॅडमीच्या पॅव्हेलिअनचे उद्घाटन सकाळी ११.४० वाजता तर वाकड येथील कै. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे लोकार्पण दुपारी १ वाजता करण्यात येणार आहे.
शहरातील खेळाडूंना विविध प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपळे सौदागर येथे खेळाचे मैदान विकसित करण्यात आले आहे. या कामासाठी ५ कोटी ५४ लाख १९ हजार रुपये इतका खर्च करण्यात आला आहे. कुणाल आयकॉन रोडवरील उभारण्यात आलेल्या या अखिल भारतीय कबड्डी पंच स्वर्गीय बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे देखील लोकार्पण दुपारी १.२० वाजता होणार आहे.
४ मेगापिक्सेलचे ७ हजार ६०० सी.सी.टी.व्ही. कॅमेरे शहरातील आठही प्रभागात बसवणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका आहे. नागरिक विशेष करून महिला आणि लहान मुले यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शहरात ठिकठिकाणी सी.सी.टी.व्ही. बसविण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे १७८ कोटी ५७ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या यंत्रणेचे तसेच वरील सर्व कार्यक्रमांचे उद्घाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.