पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न
शबनम न्युज | देहू
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाषणात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले कि, तुकोबारायांची शिळा ही भक्ती आणि आधाराचं केंद्र आहे. संत तुकाराम महाराज यांचे अभंग अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक आहेत. संतांच्या कार्यातून नित्य ऊर्जा मिळत राहते. शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला यायला मिळणे हे माझे भाग्य असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देहूमध्ये शिळा लोकार्पण सोहळ्याच्या वेळी मांडल्या.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भगवान श्री विठ्ठल आणि सर्व वारकऱ्यांच्या चरणावर माझे कोटी कोटी वंदन. आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे, मनुष्य जन्मात सर्वात दुर्लभ संतांचा सत्संग आहे. संतांची कृपा झाली, तर ईश्वराची अनुभती आपोआप होते. आज देहूच्या या पवित्र, तीर्थ भूमीवर मला येण्याचं भाग्य लाभलं आणि मी देखील इथे तिच अनुभती घेत आहे. देहू संतशिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आहे, कर्मस्थळ देखील आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव. तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे. उच्चारीती वाचे नामघोष. देहूमध्ये पांडुरंगाचा नित्य निवास देखील आहे आणि इथला प्रत्येकजण स्वत: देखील भक्तीने ओतप्रोत असा संतस्वरुपच आहे. या भावनेने मी देहूतील सर्व नागरिकांना माझ्या माता-भगिनींना आदरपूर्वक नमन करतो.” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
यानंतर आता मुंबईतील राजभवन येथे पंतप्रधानांच्या हस्ते जलभूषण इमारत आणि क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन होणार आहे. जलभूषण हे १८८५ पासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. त्याचे कार्यकाळ पूर्ण झाल्यावर, ते पाडण्यात आले आणि त्याच्या जागी नवीन इमारत मंजूर करण्यात आली. ऑगस्ट २०१९ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये जतन करण्यात आली आहेत.