शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुणे कॅम्प येथील गजबजलेल्या फॅशन स्ट्रीट परिसरात सोमवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी दोघांना अटक केली असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.
तौफिक शेख (वय, ४५) असे जखमी झालेल्या व्यक्तीने सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांवर गुन्हा दाखल केला असून त्यांची नावे जुल्फिकार बशीर कुरेशी उर्फ शेख (वय,४३ रा. चुडामन तालीम, भवानी पेठ), तबरेज कुरेशी (वय, ४६) आणि नईम उर्फ शानू शेख (वय, ३८, दोघेही पुणे कॅम्प येथील रहिवासी) आहेत.
अधिका-यांनी सांगितले की, ही घटना फॅशन स्ट्रीट असोसिएशनचे काही पदाधिकारी आणि सदस्यांमधील अंतर्गत वैमनस्यातून घडल्याचा संशय आहे. तक्रारदार तौफिक आणि आरोपी यांचा फॅशन स्ट्रीट परिसरात व्यवसाय असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीच्या वैमनस्यातून आरोपी जुल्फिकार याने तफिकवर एअर गनमधून गोळ्या झाडल्या. तौफिकला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी नईम आणि तबरेज यांना अटक केली असून, जुल्फिकारचा शोध सुरू आहे. पुणे येथील न्यायालयाने नईम आणि तबरेज यांना पुढील तपासासाठी १८ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.