शबनम न्युज | सांगली
सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील एकाच वेळी नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.दोन सख्ख्या भावांनी कुटुंबासह विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.