शबनम न्युज | मुंबई
विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मतांची आवश्यकता आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवारांची भेट घेतल्यानंतर याबाबत बावनकुळे यांना विचारलं असता, त्यांनी स्मितहास्य करत अजित दादांकडे नागपुरचं एक काम होतं, असं म्हटलं आहे. मतदानाच्या दिवशी नागपुरचं काम कसं काय काढलं? असा सवाल विचारला असता. ते म्हणाले, “आजचं मतदान झालं. १ लाख टक्के भाजपाचे पाचही उमेदवार निवडून येणार आहे. पाचवा उमेदवार हा इतर दहा उमेदवारांपेक्षा सर्वाधिक मतांनी निवडून येईल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. विधान परिषदेचा विजय हा राज्यसभेपेक्षा मोठा विजय असणार आहे, असंही ते म्हणाले.