शबनम न्युज | सांगली
म्हैसाळ येथील डॉ. माणिक वनमोरे व शिक्षक पोपट वनमोरे या बंधूंना गुप्तधनाच्या आमिषाने त्यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना विष पाजून हत्या केल्याप्रकरणी सोलापूर येथील मांत्रिक आब्बास बागवान व त्याचा साथीदार धीरज चंद्रकांत सुरवशे यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर आब्बास बागवान याने छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्याने त्यास तीन दिवस मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा साथीदार धीरज सुरवसे यास न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
मिरज पोलिसांनी त्याला शुक्रवारी (१ जुलै) सोलापुरात आणत शुक्रवारी रात्री मुस्लीम पाच्छा पेठ येथील त्याच्या घराची झडती घेतली. मिरज पोलिसांनी जवळपास ८ तास आरोपी मांत्रिकाच्या घराची झडती घेतली. झडतीमध्ये पोलिसांनी त्याच्या घरातून विविध वस्तू जप्त केल्या. यासाठी परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मांत्रिक बागवान यास म्हैसाळ गावात घटनास्थळी नेऊन हत्याकांडांची माहिती घेण्यात येणार आहे. बागवान वनमोरे बंधूंच्या केव्हापासून संपर्कात होता, त्याने गुप्तधनासाठी किती पैसे उकळले, यापूर्वीही असे कृत्य केले आहे का, वनमोरे कुटुंबीयांच्या हत्येचे नेमके कारण काय, याची पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली.