शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
ऑटोमोबाईल व इंजिनिअरिंग क्षेत्रातील कामगार, विद्यार्थी यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळावे, त्यांच्यात कौशल्यवॄद्धी व्हावी, या उद्देशाने चिंचवड येथील इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे येथे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (टीओटी) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जर्मन मॉडेलवर आधारीत हा प्रशिक्षण कार्यक्रम विनामूल्य असून या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणारांना दरमहा दहा हजार रूपये शिष्यवॄत्ती देण्यात येणार असल्याची माहिती ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलप्मेंट कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम लाहिरी यांनी दिली. पिंपरी येथे बुधवारी (दि. ६ जुलै २०२२) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जर्मनी येथील ड्यूल प्रो अँड प्रो रिकॉग्निशनच्या प्रमुख इसाबेल थेनिन्जर, जर्मन इंटरनॅशनल को-ऑपरेशनचे (जीआयझेड) व्होकेशनल ॲन्ड लेबर मार्केटिंग सल्लागार अमर प्रतापराव पाटील, इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेचे संचालक सागर शिंदे, संचालक विजय देशमुख आदी उपस्थित होते.
लाहिरी यांनी यावेळी सांगितले की, ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या दॄष्टीने पुणे हे महत्त्वाचे केंद्र आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात पुण्यातून मोठ्या प्रमाणात निर्यात होते. त्यामुळे देशाच्या प्रगतीत पुण्याचे स्थान महत्त्वाचे आहे. मात्र या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्र येत असते. नवनवीन मशिनरी येत आहेत. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत असलेल्या कामगारांना जगभरात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु, उद्योगांची गरज आणि तंत्रकुशल मनुष्यबळ यात तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी कामगारांना अत्याधुनिक प्रशिक्षणाची गरज आहे. अद्ययावत प्रशिक्षणच ही तफावत कमी करू शकते. कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी कुशल प्रशिक्षक निर्माण झाले पाहिजेत, अशा प्रकारचे प्रशिक्षक निर्माण करण्यासाठी इंजिनिअरिंग क्लस्टर पुणे तर्फे औद्योगिक प्रशिक्षकांना प्रशिक्षण (टीओटी) उपक्रम राबविण्यात येत आहे्. यात सहभागी प्रशिक्षकांना तंत्रज्ञानाबरोबर इतरांना कसे शिकवावे, याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. जर्मन येथील उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे मॉडेल वापरण्यात येणार आहे. एकूण ११ महिन्यांच्या या प्रशिक्षणात १ महिना प्रत्यक्ष कारखान्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच, हे प्रशिक्षण मोफत असून देशभरातील इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा १० हजार शिष्यवॄत्ती देण्यात येईल, असेही लाहिरी यांनी सांगितले.
इसाबेल थेनिन्जर यांनी यावेळी सांगितले की, जर्मनीतील उद्योगांमध्ये प्रशिक्षकांचे प्रशिक्षण हे मॉडेल चांगल्या पद्धतीने विकसित झाले आहे. यात गुणवत्तेला सर्वाधिक महत्त्व देण्यात येत असल्याने त्याचा कारखान्यांना चांगला फायदा होत आहे. जर्मनी आणि भारत सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती इसाबेल थेनिन्जर यांनी यावेळी दिली.
जर्मनी आणि भारत सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार हा उपक्रम राबविला जात असून, यापूर्वी औरंगाबाद येथेही हा उपक्रम राबविण्यात आला. पुण्यात २०० प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एका बॅचमध्ये २५ प्रशिक्षक सहभागी होवू शकतील. अशा एकूण ८ बॅच घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जर्मन इंटरनॅशनल को-ऑपरेशनचे (जीआयझेड) व्होकेशनल ॲन्ड लेबर मार्केटिंग सल्लागार अमर प्रतापराव पाटील यांनी दिली.
हा उपक्रम राबविण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालयाने ऑटोमोटिव्ह सेक्टर स्किल कौन्सिलची (एएसडीसी) नेमणूक केली आहे. जेसेलशाफ्ट फॉर इंटरनॅशनल झुसंमेनार्बेट (जीआयझेड)च्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सी एन सी प्रोग्रामिंग अँड ऑपरेशन, ऍडव्हान्स वेल्डिंग टेकनॉलॉजी, रोबोटिक टेकनॉलॉजी अँड ऑपरेशन, क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर , ऍडव्हान्स ऑटोमोटिव्ह टेकनॉलॉजी , सी एन सी मशीन संबंधित प्रशिक्षणामध्ये सरकारी/खासगी आयटीआय , अभियांत्रिकी महाविद्यालये , खासगी संस्था यामध्ये काम करत असलेले प्रशिक्षक यांना त्यांचे प्रशिक्षण तंत्र उच्चतम करण्यासाठी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत असलेले कुशल तंत्रज्ञ , औद्योगिक आस्थापनामधून सेवानिवृत्त झालेले व त्यांच्या कडे असलेल्या ज्ञान व अनुभवाद्वारे नवीन मुलांना प्रशिक्षित करू इच्छिणारे तंत्रज्ञ , तांत्रिक सल्लागार यांना सी एन सी मशीन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (TOT ) या जर्मन ड्युएल वेट मॉडेल वर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक बनण्याची संधी उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणात जर्मनी येथील वरिष्ठ प्रशिक्षक प्रशिक्षण देतील, अशी माहिती इंजिनिअरिंग क्लस्टर पुणेचे संचालक सागर शिंदे यांनी यावेळी दिली. .
या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंजिनीरिंग क्लस्टर पुणे तर्फे करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती मिळावी या उद्देशाने दिनांक १२ जुलै २०२२ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेमध्ये इंजिनीरिंग क्लस्टर चिंचवड येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पुढील लिंक वर नाव नोंदणी करण्यात यावी. https://forms.gle/