शबनम न्युज | पुणे
ओम नमःशिवाय अधिष्ठान, पिंपरी-चिंचवड आणि पुणे यांच्या वतीने गुरुवार, दिनांक २८ जुलै २०२२ ते सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२२ या मासिक कालावधीमध्ये श्री क्षेत्र काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जन्म अमृतमहोत्सवानिमित्त बत्तिसाव्या ‘श्रावणमास तपोनुष्ठान’ सोहळ्याचे चिंचवडे लॉन्स कार्यालय, बिर्ला हॉस्पिटलजवळ, चिंचवडगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे अडीच कोटी ‘ओम नमःशिवाय’ नापजप यज्ञ या मुख्य कार्यक्रमासह महिनाभर दररोज सकाळी सात ते आठ नामजप, आठ ते अकरा महास्वामी इष्टलिंगपूजा आणि दांपत्यपूजा, दुपारी अकरा ते बारा दरम्यान स्वामींचे दर्शन आणि महाप्रसाद तसेच सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत भजन, सांगीतिक कार्यक्रम, जगद्गुरूंचे आशीर्वचन आणि महाप्रसाद हे दैनंदिन कार्यक्रम संपन्न होतील.
गुरुवार, दिनांक २८ जुलै २०२२ रोजी दुपारी तीन वाजता मोरया गोसावी मंदिर ते कार्यक्रमस्थळापर्यंत महास्वामींच्या भव्य मिरवणुकीने सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे. बुधवार, दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण दिवसभर जगद्गुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होतील. रविवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी अय्याचार आणि शिवदीक्षा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याच्या समारोप प्रसंगी म्हणजे सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी उज्जयिनी, श्रीशैल्य आणि नूतन काशी येथील जगद्गुरूंची अड्डपालखी मिरवणूक काढण्यात येऊन सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.
सोहळ्यात दिनांक ०८ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२२ या कालावधीत कार्यक्रमस्थळी महास्वामीजींच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनानिमित्त महाआरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणूक, दांपत्यपूजा, महास्वामींचे पाद्यपूजन, दीक्षाविधी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुक भक्तांनी कार्यक्रमस्थळी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक ९६६५३८३००० वर संपर्क साधावा; तसेच विनाशुल्क असलेल्या दैनंदिन कार्यक्रम आणि महाप्रसादाचा सर्व नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य संयोजक महेश स्वामी यांनी केले आहे.