शबनम न्यूज | पुणे
पुण्यातील नाना पेठ परिसरातील एका खासगी शाळेतील तीन शिक्षकांनी दहावीच्या तीन विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी व वर्गात गोंधळ घातल्याने अंतर्गत मुल्यांकनात कमी गुण देण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाल न्याय कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २८ जुलै रोजी शाळेतील दहावीच्या एका विभागात घडली होती. तीन मुलांपैकी एकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला. पोलिसांनी तीन पुरुष शिक्षकांवर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एफआयआरनुसार, २८ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका शिक्षकाने तीन विद्यार्थ्यांना वर्गात बेदम मारहाण केली. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्टाफ रूममध्ये नेले जेथे त्याने आणि इतर दोन शिक्षकांनी त्यांच्यावर हल्ला केला, असे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.