शबनम न्यूज | पुणे (वृत्तसंस्था)
दुचाकी चोरून पुण्यातील ग्रामीण भागात पोलिस असल्याचे भासवून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांच्याकडून चोरीच्या १४ दुचाकी आणि बनावट पोलिस ओळखपत्र आणि एक गणवेश जप्त करण्यात आला आहे.
चिंचवड पोलीस ठाण्याचे पथक अलीकडच्या काळात दुचाकी चोरीच्या अनेक घटनांचा तपास करत होते. एका विशिष्ट माहितीवर काम करत पोलिसांनी अलीकडेच दोन संशयितांवर कारवाई केली.
चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात सोमवारी सापळा रचून दीपक नारायण बनसोडे (वय,३१) आणि श्रीमंत विनायक सुरवसे (वय,२९) या दोन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्या सविस्तर चौकशीत पिंपरी-चिंचवड आणि पुणे हद्दीतील चिंचवड, सांगवी, निगडी, विमाननगर आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून अलीकडच्या काळात झालेल्या किमान १४ दुचाकी चोरींमध्ये त्यांची भूमिका उघड झाली. जप्त करण्यात आलेल्या १४ दुचाकींपैकी बहुतांश बाईक पुण्याच्या ग्रामीण भागात विकल्या गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले, “आम्ही बनावट पोलिस आय-कार्ड आणि गणवेश जप्त केला आहे आणि काही कागदपत्रांवरून असे सूचित होते कि, हे संशयित पोलिस असल्याचे भासवत असत. शहरातून दुचाकी चोरल्यानंतर ते ज्यांना विकत होते त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ते या दुचाकी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकायचे.