शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक विजय ऊर्फ शीतल शिंदे आणि पिंपरी येथील एच. ए. स्कूलच्या प्राथमिक विभागाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने रविवारी (दि. १४) चिंचवडगावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हातात तिरंगा राष्ट्रध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमन गेला होता.
या प्रभात फेरीची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता श्रीधर नगर, चिंचवड येथील नगरसेवक शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून झाली. मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, शिक्षिका अर्चना गोरे, शेहनाज हेबाळकर, शिक्षक डॉ. विठ्ठल मोरे, नगरसेवक विजय ऊर्फ शीतल शिंदे यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी भाजपचे केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
ही रॅली दर्शन हॉल मार्गे चिंचवड गावातील चापेकर स्मारकापर्यंत गेली. यावेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, अशा घोषणा दिल्या. देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारी सेनानी, भारतमाता आणि क्रांतिकारकांच्या वेशभूषांचे प्रात्यक्षिक प्रभात फेरीच्या माध्यमातून दाखविण्यात आले. परिसरातील नागरिकांचे विद्यार्थ्यांनी याद्वारे लक्ष वेधून घेतले. पतंजलीचे डॉ. अजित जगताप यांनी या रॅलीचे स्वागत केले.
चापेकर स्मारकास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी चौथीतील विद्यार्थी, बालशाहीर मल्हार वराळे याने जोशपूर्ण विचार मांडले. त्यानंतर ही रॅली पुन्हा श्रीधर नगर, चिंचवड येथे साडेअकरा वाजता आली. यावेळी विद्यार्थ्यांना नगरसेवक शितल शिंदे यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले.