शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे येथे आजादी का अमृत महोत्सव या दिनाचे औचित्य साधून शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलात ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी मा. श्री. पाटील आर.पी.-प्रशासकीय संचालक, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले तर विठ्ठल कोंडीबा तळेकर – मा. सरपंच डुडुळगाव व मा. श्री. ज्ञानेश्वर वरुटे – बांधकाम उद्योजक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन संपन्न झाले.
या प्रसंगी राजा शिवछत्रपती विद्यालय आणि आदित्य इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह.भ. प. तुषार महाराज खताळे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतांना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या स्वातंत्र्यवीरांचा वाटा असून त्यांनी देशासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कसे बलिदान दिले हे विविध उदाहरणासह विवेचन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी या प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ‘ महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण ‘ या संस्थेच्या ब्रीद वाक्याचा उच्चार केला. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व व्यक्त करतांना ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त केले त्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्याचा आजचा हा दिवस असून भारतीय नागरिकांचे देशाप्रती, समाजाप्रती काय कर्तव्य असले पाहिजे या संदर्भात भूमिका मांडली तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, तात्या टोपे, झाशीची राणी, लाल- बाल -पाल तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कसा मोलाचा वाटा असून भारतीय नागरिकांनी देश संरक्षणासाठी, देश विकासासाठी त्यागाची आवश्यकता आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सर्जेराव बरकडे यांनी केले तर डॉ. सुरेंद्र पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी डॉ. प्रमोद इंगळे प्राचार्य – ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, शितल पाटील मुख्याध्यापिका – आदित्य इंग्लिश स्कूल व श्री.अतुल पानसरे मुख्याध्यापक – राजा शिवछत्रपती विद्यालय यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्वातंत्र्य दिना निमित्त शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलातील शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, रामचंद्र पाटील औटी ज्युनियर कॉलेज, राजा शिवछत्रपती विद्यालय व आदित्य इंग्लिश स्कूल मधील सर्व विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.