शबनम न्युज | मुंबई
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली.त्यानंतर विधानसभा, विधान परिषदेच्या कामकाजाला सकाळी ११ च्या सुमारास सुरुवात झाली. दोन्ही सभागृहात राष्ट्रगीताने कामकाजाची सुरुवात झाली. नंतर विधान परिषदेतील सभागृह नेतेपद रिक्त होते. या पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र पाठवून या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करावी अशी शिफारस केली होती. त्यानंतर सभागृहाच्या संमतीनंतर उपसभापतींनी देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली.
विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त सदस्यांची ओळख देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिली. यात रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रविण दरेकर, सचिन अहिर, प्रा. राम शिंदे, भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, अमशा पाडवी, श्रीकांत भारतीय यांचा समावेश होता.