दुसऱ्यांदा आयर्न मॅन चा किताब मिळवणाऱ्या प्रसाद पाटिल यांचा सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने सत्कार
शबनम न्युज | पिंपरी
विशाल नगर, पिंपळे निलख येथील रहिवासी व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता पदावर सेवेत असणारे प्रसाद पाटील यांनी कझाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत आयर्न मॅन हा किताब पटकावला. प्रसाद पाटील यांनी वयाच्या ३६ व्या वर्षी हा किताब दुसऱ्यांदा मिळवून पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे. अशा खेळाडूंचा मनपाने उचित सन्मान करावा अशी मागणी आपण पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त, प्रशासक यांच्याकडे करणार आहोत असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी सांगितले.

सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रसाद पाटील यांचा बुधवारी (दि. १७) त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन साठे, काळूशेठ नांदगुडे, भुलेश्वर नांदगुडे, अनिल संचेती, अनंत कुंभार, अश्विन भुते, श्रीधर दाते आदी उपस्थित होते. यावेळी प्रसाद पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले की, नूर सुलतान (कझाकीस्थान) येथे दि. १४ ॲागस्ट ला झालेल्या “IRONMAN triathlon” चे आव्हान मी १३ तास १५ मिनिटात पूर्ण केल्यामुळे मला “आयर्न मॅन” किताब देऊन गौरवण्यात आले. मागील वर्षी जर्मनी येथे २९ ऑगस्ट ला झालेल्या या स्पर्धेत मी १३ तास २७ मिनिटाची वेळ नोंदवून पहिल्यांदा हा किताब मिळवला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागणारी हि स्पर्धा आहे. त्यामुळे जगभर आयर्नमॅन स्पर्धेची क्रीडाविश्वात ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा कस लागतो. सलग ३.८ कि.मी. खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी २००० इतर स्पर्धकांसोबत पोहणे, त्यानंतर लगेच प्रचंड वेगाने वाहणा-या वा-या विरुद्ध सायकलिंग करणे व लगोलग ४२.२ किमी धावणे ही आव्हाने सलगपणे पूर्ण करायची असतात. हे आव्हान १६ तासाच्या आत पूर्ण करणाऱ्यास “IRONMAN” हा किताब बहाल केला जातो. भारतातून इतर १८० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. मी हे आव्हान १३ तास १५ मिनिटात पूर्ण केले. माझे प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ, ओमकार जोकार, स्वप्निल चिंचवडे, अश्वीन भूते यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे मला हे शक्य झाले. मेहनत, जिद्द, सातत्य, कठोर परिश्रम या बळावर ही स्पर्धा पूर्ण केली. तसेच महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागात अशी स्पर्धा पूर्ण करणारा मी पहिला अधिकारी ठरलो आहे असेही प्रसाद पाटिल यांनी सांगितले.

Advertisement