शबनम न्युज | मुंबई
मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी बीड, लातूर व उस्मानाबाद यांसह काही जिल्ह्यांमधील सोयाबीन पिकांचे गोगलगायींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तीन-चार वेळा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पीकही हाती लागले नाही. कपाशीवर पडलेल्या बोंडअळीसाठी ज्याप्रमाणे विशेष मदत देण्यात आली, त्याप्रमाणे गोगलगायींनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. झालेल्या नुकसानीची दाहकता व प्रमाण पाहता राज्यसरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे मदतीच्या तिप्पट मदत द्यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधीद्वारे केली.
या लक्षवेधीवर राज्य सरकारच्यावतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर देताना सदर नुकसानीची माहिती राज्य शासनास पूर्णपणे प्राप्त व्हावी यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ शास्त्रज्ञ व अभ्यासक अशा ५ अधिकाऱ्यांची समिती नेमून गोगलगायींनी केलेल्या नुकसानीचा अभ्यास व पडताळणी करून अहवाल मागवला जाईल. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले.