माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ‘सूर्यदत्त’ परिवाराकडून शुभेच्छा
शबनम न्युज | पुणे
देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि उपाध्यक्षा सौ सुषमा चोरडिया यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे कोविंद यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा व नाविन्यपूर्ण अशा ‘इंडो ग्लोबल सिनारियो फ्रॉम २०२२ टू २०४७’ पुस्तिकेची प्रथम प्रत भेट दिली. या वैशिष्ट्यपूर्ण पुस्तिकेमध्ये आतापर्यंतच्या जागतिक घडामोडींचा मागोवा घेत पुढील २५ वर्षातील अपेक्षित बदलांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. भारत एक महासत्ता म्हणून उदयाला येत असताना काय बदल घडतील, कोणती क्षेत्रे प्रभावित होतील व कोणत्या क्षेत्रांचा फायदा होईल याचा या पुस्तिकेत आढावा घेण्यात आला आहे.
या भेटीत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी कोविंद यांना सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजीच्या (एसआयएफटी) विद्यार्थ्यांनी बनवलेली व सूर्यदत्तचे बोधचिन्ह (लोगो) असलेली वैशिष्ठ्यपूर्ण अशी पुणेरी पगडी भेट दिली व सौ. सुषमा चोरडिया यांनी कोविंद यांना राखी बांधून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. तसेच सूर्यदत्त वुमन एम्पावरमेंट अँड लीडरशिप अकॅडेमीच्या (SWELA) सूर्यदत्त सोशल अँड वुमन एम्पावरमेंट इनिशिएटिव्हचे माहिती पुस्तक भेट दिले. या प्रसंगी दिल्ली येथील विशेष मान्यवर उपस्थित होते.
रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या पुणे शहराबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. अभिमानास्पद भारतीय संस्कृती हीच माझा अविभाज्य घटक आहे. भारतीय संस्कृतीचा गौरव वाढवण्यासाठी आणि बलशाली प्रजासत्ताक निर्मितीसाठी महत्वाचे योगदान देता यावे, ही माझी भूमिका आहे. सूर्यदत्त ज्या पुण्याचे प्रतिनिधित्व करते, त्याच्याशी माझे नाते जोडले गेले आहे. उद्योग, स्टार्टअप, स्टँडअप इंडिया, आत्मनिर्भर भारत याबाबत पुणे आघाडीवर आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खुणावणार हे शहर आहे. आधुनिकतेसोबत पुण्याने तिथला सांस्कृतिक वारसाही जपला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या गौरवाला आणि शहर विकासालाही तिथे महत्त्व दिले जातेय. संतांचे महत्त्व असलेली ही भूमी आहे. देशाच्या स्वातंत्र्यात पुण्याचे ऐतिहासिक योगदान राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक प्रतिभावान व्यक्ती, कलाकार, समाजसेवकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीच्या आणि येथे वास्तव्यास असणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांच्याशी संबंधित अनेक आठवणी मनात असल्याचे आणि कृतज्ञ असल्याचे यावेळी रामनाथ कोविंद यांनी सांगितले.
प्रा डॉ संजय बी चोरडिया म्हणाले, “अतिशय विपरित परिस्थितीत संघर्ष करणारे रामनाथ कोविंद हे आपल्या सगळ्यांसमोर एक आदर्श आहेत. त्यांचा जीवन संघर्ष आणि संकटांवर मात करण्याची त्यांची इच्छाशक्ती ही आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. एखादी व्यक्ती इतकी जमिनींवर पाय असणारी असावी याचे खूप आश्चर्य वाटले. कमालीची विनम्रता आणि आपण ज्या समाजातून आलो आहोत, त्यांचे देणे असल्याची भावना त्यांच्यात असलेली पाहून मी भारावून गेलो. खरोखरच देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ अभिमानास्पद राहिला आहे यात तीळमात्र शंका नाही. एक यशस्वी वकील, खासदार, राज्यपाल व राष्ट्रपती म्हणून कोविंद यांची कारकीर्द यशस्वी ठरली आहे. आम्हाला त्यांनी भेटीची संधी दिली व शुभाशीर्वाद दिले यात आम्ही धन्यता मानतो. त्यांच्याशी झालेली भेट अत्यंत रोमांचकारी आणि अविस्मरणीय होती.”