शबनम न्युज | आळंदी
श्री. गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या, शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुल आळंदी, डुडुळगाव, जि. पुणे. या ठिकाणी शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे सर, संस्थापक, श्री. गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, यांच्या ७५ व्या जयंती चा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख वक्त्या स्व. विलासराव तांबे यांच्या कन्या मा. डॉ. वृषालीताई अमित मेदनकर होत्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, बबनराव पर्वतराव कुऱ्हाडे पाटील ( माजी नगराध्यक्ष आळंदी न.पा.) होते.कार्यक्रमध्ये अमित मेदनकर, राजीव पाटील ( प्रशासकीय संचालक, ग.म.शि.प्र. मंडळ), डॉ. हंसराज थोरात (प्राचार्य शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय ) मा.अतुल पानसरे (मुख्याध्यापक राजा छत्रपती विद्यालय ) तसेच मा. शीतल पाटील (मुख्याध्यापिका आदित्य इंग्लिश स्कूल) व मा.श्री. मयूर ढमाले ( खजिनदार, श्री. गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.रणजीत कदम (वाणिज्य विभाग प्रमुख) यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या कार्यक्रमाचे औचित्य, महत्त्व व उद्दिष्ट सांगितले. या कार्यक्रमांमध्ये यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करताना शिक्षण महर्षी स्व. विलासराव तांबे सर यांच्या काही आठवणींना उजाळा दिला व शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदान यावर प्रकाश टाकला. प्रा. दिलीप बारी यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.वृषाली मेदनकर यांनी आपल्या व्याख्यानामध्ये मातृ – देवो भव पितृ देवो भव ही संकल्पना मांडताना माझे वडील माझे मित्र, शिक्षक व मार्गदर्शक असे सर्व काही होते,असे सांगितले. मी प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टी त्यांना सांगायची ते मला मित्राप्रमाणे सल्ला द्यायाचे, वडिलांनी माझ्यावर उत्तम संस्कार केले व शिस्त लावली. इंग्रजी माध्यमातून मला मराठी शाळेमध्ये घातले, त्याचे कारण म्हणजे आमच्या तिघांच्या फी मध्ये गोरगरिबांची अनेक मुले शिकतील ही त्यांची अपेक्षा होती. होस्टेल मध्ये सुद्धा मला इतर मुलींप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे अशी त्यांची धारणा होती. मी डॉक्टर व्हावे हे वडिलांचे स्वप्न होते. त्यासाठी मी लंडनमध्ये राहून संशोधन केले. माझ्याकडून देशसेवा, राष्ट्रसेवा, व समाजसेवा घडावी ही त्यांची इच्छा होती. माणूस कितीही मोठा झाला तरी त्यांचे पाय जमिनीवर असावेत, ही त्याची भावना होती. शिक्षणासाठी मी अतिशय योग्य दिशेने प्रामाणिकपणे कष्ट घेतले व त्यांचे स्वप्न साकार केले. माझ्या जिवनातले सूत्र म्हणजे प्रत्येक संधी ही शेवटची समजुन प्रयत्न करावेत. मी ही लहानपणी खेळकर खोडकर होते. परंतु अभ्यास मात्र एकाग्रतेने करीत होते . प्रथम मला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये सहाय्यक समन्वयक म्हणून रुग्णाची सेवा करण्याची संधी मिळाली. मला वेतन मिळत असले तरी मला माझे वडील पॉकिट मनी म्हणून पैसे देत असत, तसेच अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्रा मधील उदाहरण त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना दिले व त्याचे महत्त्व सांगितले . एक आदर्श वडील व आदर्श मुलगी यांच्या मधील संबंध कसे असावेत हे ही त्यांनी सांगितले. तसेच साहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला व मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी मयूर ढमाले यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परमेश्वर भताशे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्राचार्य डॉ. प्रमोद इंगळे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शिक्षणमहर्षी स्व. विलासराव तांबे शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, या कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली.