शबनम न्युज | पिंपरी
भोसरी कला, क्रीडा मंच ही सांस्कृतिक, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागील सतरा वर्षांपासून काम करणारी अग्रेसर संस्था आहे. या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इतकी वर्षे सातत्याने नियमित कार्यक्रम करणे आणि प्रेक्षक वर्ग मिळवणे हे कठीण काम आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे आणि त्यांचे सर्व सहकारी, आयोजक यांनी मोठ्या परिश्रमाने सुरू केलेले हे काम अभिनंदनीय आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी “भोसरी महोत्सव २०२२” च्या समारोप समारंभात केले.
भोसरी कला, क्रीडा मंचच्या वतीने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दि. १ सप्टेंबर पासून घेण्यात आलेल्या “भोसरी महोत्सव २०२२” चा समारोप समारंभ सोमवारी ( दि.५) खा. डॉ. कोल्हे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी आयोजक व पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, ज्येष्ठ माजी नगरसेवक पंडित शेठ गवळी, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, सुनंदा फुगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, कार्याध्यक्ष विजय फुगे, उपाध्यक्ष भरत लांडगे, सचिव सुनिल लांडगे, निवृत्ती फुगे, किशोर गव्हाणे, किरण लांडगे, भाऊसाहेब डोळस, रेखा गव्हाणे, गौरी लोंढे आदी उपस्थित होते.
खा. डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज की जय हो असा उत्स्फूर्त निघणारा जयघोष ही आपली संस्कृती, आपले संस्कार आहेत. साडेतीनशे वर्षाच्या गुलामीनंतर काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या मुघल सत्ते विरोधात एतदेशीय हिंदू राजा उभा ठाकला होता. ते राजे म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून तर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी राजे होते. आगामी शिवप्रताप गरूड झेप या चित्रपटात महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा दैदिप्यमान इतिहास सांगितला आहे. इतिहासातील या घटनेने उभ्या हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली असेही खा. कोल्हे म्हणाले.
यावेळी बॉईज -३ या चित्रपटातील कलाकार पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, प्रतिक लाड, विदुला चौघुले, दिग्दर्शक विशाल देवरुखकर, निर्माता राजेंद्र शिंदे, अंकिता लांडे आदीं बरोबर गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांची मुलाखत पूजा थिगळे यांनी घेतली. समारोप प्रसंगी पूनम कुडाळकर व सीमा पुणेकर यांच्या ‘तुमच्यासाठी काय पण’ लावणीचा कार्यक्रमा झाला. महोत्सव यशस्वी करण्यासाठी विजय लांडगे, दत्ता फुगे, नंदू लोंढे, यशवंत डोळस, संजय बेंडे, शाम लांडगे, मनोज जगताप, बाळासाहेब भालेराव, जीवन फुगे आदींनी परीश्रम घेतले. स्वागत ॲड. नितीन लांडगे, सूत्रसंचालन निकिता भैरट, आभार संदीप राक्षे यांनी मानले.