शबनम न्युज | पुणे
आरटीआय अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेविकेकडून २५ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी स्वयंघोषित आरटीआय कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र अशोक भोसले (रा. विमान नगर) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर यापूर्वी खंडणीच्या तीन गुन्ह्यांसह आणखी सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेविकेच्या पतीने नुकतेच भोसले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी बेकायदेशीर बांधकामात सहभागी असल्याचा आरोप करत तक्रारदार आणि त्यांच्या पत्नी विरुद्ध वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात आरटीआय अर्ज दाखल केले होते. भोसले यांनी हे अर्ज मागे घेण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली असून, आगामी महापालिका निवडणुकीत तक्रारदाराची सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी दिली. त्याची मागणी पूर्ण न केल्यास तक्रारदारा विरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाने खंडणीच्या आरोपाशी संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५ आणि ३८७ अंतर्गत भोसले यांच्याविरुद्ध विमान नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.