शबनम न्युज | पिंपरी
राजे उमाजी नाईक हे क्रांतिकारक, प्रखर देशभक्त आणि युद्धनीती निपुण असे थोर क्रांतिकारक होते, स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्धच्या बंडाची घोषणा करून त्यांनी देशाप्रती केलेले महान कार्य कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन आमदार उमा खापरे यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस आमदार उमा खापरे आणि उप आयुक्त रविकिरण घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार खापरे बोलत होत्या.
यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, वंचित बहूजन आघाडीचे संतोष जोगदंड, एच.एम. शिंदे तसेच कर्मचारी उपस्थित होते.
राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड करुन देश स्वतंत्र करण्यासाठी व्यापक लढा उभारला. राजे उमाजी हे तलवारबाजी, दांडपट्टा, भाला, तीरकामठा अशा युद्धकलेत निपुण होते. देशासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला होता. त्यांना जनतेची तसेच हजारो क्रांतिकारकांची साथ होती. राजे उमाजींनी परकीय राजवट उलथून टाकण्यासाठी स्वतःचे लष्कर उभे केले होते. तर त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी त्यावेळी जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. उमाजींना अटक करून त्यांना पुण्यातील मामलेदार कचेरी येथे फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांच्या बलीदानातून क्रांतिकारकांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी स्फूर्ती मिळावी.