शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी जयश्री साठे यांची निवड करण्यात आली. तसेच तृप्ती शर्मा (सचिव), शोभा फटांगडे (खजिनदार) यांच्यासह नवनिर्वाचित कार्यकारिणीला एमजेएफ जगदीश पुरोहित यांनी आपल्या अनोख्या शैलीतून पदाची शपथ दिली. या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आळंदी येथील वेदान्ताचार्य ह.भ.प. डॉ. नारायण महाराज उपस्थित होते; तसेच रिजन चेअरमन अनिल झोपे, झोनल चेअरमन सुदाम भोरे, ज्येष्ठ कवयित्री संगीता संगीता झिंजुरके, कवी भरत दौंडकर यांची विशेष उपस्थिती होती.
लायन्स क्लब भोजापूर गोल्डच्या माध्यमातून वर्षभर आरोग्य, शिक्षण, साहित्य, अध्यात्म या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले जाते. पदग्रहणाच्या निमित्ताने भोसरी पोलीस स्टेशनच्या विनंतीवरून भोसरी उड्डाणपुलाखाली कायमस्वरूपी चौदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा संच बसविण्यात आला. वारकरी मुलांना माधुकरी मागण्यासाठी तीन सायकली सप्रेम भेट देण्यात आल्या. जिल्हा परिषद शाळा, नरकेवाडी येथील सुमारे चौसष्ट विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढी शैक्षणिक मदत करण्यात आली. घरकाम करणाऱ्या गरीब विद्यार्थिनीला शालेय मदत आणि आळंदी येथील वेदान्तभवनाच्या बांधकामासाठी मदतनिधी देण्यात आला आहे.
यासाठी डॉ. विलास साबळे, डॉ. रोहिदास आल्हाट, डॉ. सुहास कांबळे, मुरलीधर साठे, जयश्री साठे, शोभा फटांगडे, तृप्ती शर्मा, प्रा. शंकर देवरे, प्रा. दिगंबर ढोकले यांनी भरीव अर्थसाहाय्य दिले आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष जयश्री साठे यांनी आपल्या मनोगतातून आदिवासी आणि दुर्गम भागात वस्त्रदान, महिला कर्करोग आरोग्य तपासणी शिबिर, स्वयंरोजगार कार्यशाळा, वृक्षारोपण आणि संवर्धन, गरीब-गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशा विविध नियोजित प्रकल्पांविषयी माहिती दिली. याप्रसंगी लिओ क्लब पदग्रहण सोहळाही संपन्न झाला. त्यासाठी स्मृती शर्मा आणि त्यांच्या कार्यकारिणीला पदग्रहणाची दीक्षा देण्यात आली. प्रा. दिगंबर ढोकले आणि मुकुंद आवटे यांनी सूत्रसंचालन केले. स्मृती शर्मा यांनी आभार मानले.