शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांचे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच संपूर्ण शहरात दररोज पाणीपुरवठा व्हावा व थांबलेला महापौर निधी ( वैद्यकीय सेवेसाठी) प्रशासक म्हणून पुन्हा चालू करावा, अशी मागणीचे निवेदन शिवसेनेच्या मा. नगरसेविका मिनल विशाल यादव यांच्या वतीने देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परंतु मागील २ वर्षापासून धरण क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने तसेच पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. दिवसा आड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे कामगार महिलांचे अतोनात हाल होतात, तसेच त्यांना तारेवरची कसरत करावी लागते, कामाचे वेळ सांभाळून त्यांना पाण्याचे नियोजन करावे लागते, तसेच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाणी साठवून ठेवतात व ते दुसर्या दिवशी पाणी आल्यावर पुन्हा ओतून देतात त्यात पाण्याची नासाडी होते. त्यामुळे शहरवासियांना चोवीस तास नव्हे तर कृपया दररोज चार ते पाच तास पाणी पुरवठा व्हावा, तसेच गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेच्या कारभारावर प्रशासक नेमल्यामुळे महापौरांची खुर्ची रिकामी आहे व गोरगरिबांना वाटण्यात येणारी वैद्यकीय मदत थांबण्यात आलेला आहे. तरी आपण प्रशासक म्हणून या महापौर निधीचा गोरगरिबांना फायदा व्हावा म्हणून त्याचे वाटप आपल्या वतीने पुन्हा व्हावे, असेही सदर निवेदनात मिनल यादव यांनी नमूद केले आहे.
यावेळी निवेदन देताना, जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे, वैशाली मराठे (उपजिल्हा संघटिका ), वैशाली कुलथे (उपशहरसंघटिका), रजनी वाघ (उपशहरसंघटिका), बेबी सय्यद ( विभागसंघटिका),कोमल जाधव ( विभागसंघटिका), शिल्पा अनपन ( विभागसंघटिका), अश्विनी खंडेराव ( विभागसंघटिका), प्रांजल पाडेकर, सौ स्मिता पाटील, सौ शोभा मोरे (विभाग संघटिका मोहननगर) आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.