चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन; नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवाचा समारोप
शबनम न्युज | पुणे
“समाजात वाढणारी नकारात्मकता कमी करण्याचे काम नवचैतन्य हास्ययोग परिवार करत आहे. सद्यस्थितीत हास्यक्लब लोकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देत आहे. आनंदी जीवनासाठी हास्ययोग गरजेचा असून, हास्य योगाचा प्रसार आणखी जोमाने व्हावा, यासाठी लवकरच कोथरूडमध्ये हास्ययोग भवन उपलब्ध करून दिले जाणार आहे,” असे आश्वासन राज्याचे उच्च व तांत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्याच्या समारोपावेळी पाटील बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या सोहळ्यात शहर भाजपचे संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा प्रभुणे, डॉ. सतीश देसाई, ‘नवचैतन्य’चे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे, सुमन काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव पोपटलाल शिंगवी, विजय भोसले आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “पोटाच्या भुकेनंतर मनाची भूक महत्वाची असते. आज जगात ‘हॅपिनेस इंडेक्स’ला महत्व आले असून, लोकांना आनंदी जीवन जगण्यात हास्यक्लब मोलाची भूमिका बजावत आहे. ही चळवळ समाजाला सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. यातून ‘स्व’चा शोध घेण्यासाठी लोक प्रयत्न करत आहेत.”
मकरंद टिल्लू यांनी स्वागत प्रास्ताविक केले. विठ्ठल काटे यांनी आभार मानले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनीही विविध हास्यप्रकाराची प्रात्यक्षिके करत आनंद लुटला.
‘रंगीला रे…’ने श्रोते मंत्रमुग्ध
दिवसभर रंगलेल्या या आनंदमय सोहळ्याच्या उत्तरार्धात गायिका मनीषा निश्चल, गायक गफूर पठाण व सहकाऱ्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना समर्पित ‘रंगीला रे…’ सदाबहार गीतांचा नजराणा सादर केला. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या अजरामर गीताला खुद्द चंद्रकांत पाटील यांनीही उत्स्फूर्त दाद दिली. त्यानंतर निश्चल व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.