शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महापालिकेतील नवे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते वसई-विरारचे उपआयुक्त म्हणून कार्यरत होते.विकास ढाकणे यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तपदावर पालिकेतील उपआयुक्त स्मिता झगडे यांची वर्णी लागली होती. तथापि, या पदावर रुजू होण्यापूर्वीच त्यांची पदोन्नती रद्द करण्यात आली. त्यांना मूळ पदावर काम करण्याचे आदेश देण्यात आले.त्या जागेवर जांभळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जांभळे शुक्रवारी सकाळीच शहरात दाखल झाले. काही प्रमुखांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर दुपारी मुख्यालयात येऊन त्यांनी पदभार स्वीकारला.
स्मिता झगडे यांना पुन्हा महापालिकेच्या उपायुक्त पदी जैसे थे ठेवण्यात आले आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी गुरुवारी काढले आहेत. शासन आदेशात म्हटले आहे कि, प्रदिप बाबुराव जांभळे- पाटील सध्या प्रतिनियुक्ती उपायुक्त वसई विरार महानगरपालिका यांची महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-३९ अ नुसार अतिरिक्त आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या पदावर दोन वर्षाच्या कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात येत आहे.प्रदिप बाबुराव जांभळे पाटील यांनी उपायुक्त वसई – विरार महानगरपालिका या पदावरुन कार्यमुक्त होऊन प्रतिनियुक्तीच्या पदावर रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.