डॉ. रोहिणीताई पटवर्धन यांचे मत; लोकमान्य हास्ययोग संघ परिवारातर्फे पश्चिम विभागीय मेळावा
शबनम न्युज | पुणे
“शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हास्ययोग महत्वाचा आहे. हास्य योगाला अध्यात्मिक, वैज्ञानिक आधार आहे. सकाळच्या प्रसन्न व आल्हाददायी वातावरणात एक तास हास्ययोग केला, तर आपल्याला संपूर्ण दिवसभर उत्साहाने काम करण्याची ऊर्जा मिळते,” असे मत वृद्धत्वशास्त्र तज्ज्ञ डॉ. रोहिणीताई पटवर्धन यांनी व्यक्त केले.
लोकमान्य हास्ययोग संघ परिवाराच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पौड रस्त्यावरील पुण्याई सभागृहात आयोजित पश्चिम विभागीय मेळाव्यात डॉ. पटवर्धन बोलत होत्या. प्रसंगी हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, उपाध्यक्ष डॉ. जयंत मुळे, उपाध्यक्ष बंडोपंत फडके, पश्चिम विभागीय समन्वयक शंकर गुंजाळ, प्रसाद अंबिकर आदी उपस्थित होते.
डॉ. रोहिणीताई पटवर्धन म्हणाल्या, “हास्यक्लब ही चळवळ आता जगभर विस्तारली आहे. सकाळी एक तास हास्ययोग करणाऱ्या व्यक्ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम, आनंदी असल्याचे दिसून येते. प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आरोग्याचा विचार करून, स्वतःला वेळ द्यायला हवा. नियमित हास्य योग केला, चांगला आहार ठेवला आणि चांगल्या विचारांना आत्मसात केले तर आपण सकारात्मकपणे काम करू शकतो. इतरांनाही मदत करण्याची भावना आपल्या मनात निर्माण होते.”
डॉ. सुभाष देसाई म्हणाले, “हास्य योगाची साधना गरजेची आहे. आनंदी व निरोगी दीर्घायुष्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी हास्ययोग उपयुक्त आहे. लोकमान्य हास्ययोग संघाच्या परिवारात वाढ होत असून, आज ७० शाखातुन चार हजार लोक सहभागी होत आहेत.”
द्वितीय सत्रात ‘हास्य’ या विषयावर समुहगीत, नृत्य, नाट्य असे विविधांगी सादरीकरण झाले. प्रास्ताविक डॉ. प्रसाद अंबिकर यांनी केले. सूत्रसंचालन दीपा पराडकर व डॉ. मानसी अंबिकर यांनी केले. सुहासिनी दीक्षित यांनी आभार मानले.