शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव आळंदी पुणे. येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वा. ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रीय सेवा योजनेच्या गीताने झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रम अधिकारी प्रा.संजीव कांबळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे योगदान महत्वपूर्ण असून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना समाजसेवा करणे तसेच आपल्या आसपासच्या परिसरामध्ये लोकांमध्ये मिळून मिसळून सामाजिक कार्य जोपासणे अत्यंत महत्वाचे आहे असे मत व्यक्त करत कार्यक्रमाचे स्वरूप सांगितले. प्रा.कैलास अस्तरकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. धनंजय लोखंडे, मा. संचालक व विभागप्रमुख आजीवन अध्ययन व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मा. सन्मवयक- राष्ट्रीय सेवा योजना यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी व्यक्तिमत्त्वाचे धडे विद्यार्थ्यांना देत राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा कसा व्यक्तिमत्व विकास होतो या बाबत अनमोल असे मार्गदर्शन केले. २४ सप्टेंबर १८७३ रोजी ‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना करून ज्या प्रकारे सामाजिक कार्याचे बीजारोपण केले तोच वारसा स्वीकारून आपण हि आपल्या जीवनात त्यांचा आदर्श जपला पाहिजे या बाबत सविस्तर विवेचन केले केले. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांना अनेक संधी प्राप्त होतात तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होतो त्यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी राष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग नोंदवला पाहिजे या बाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू सविस्तर मांडून स्वालंबन सेवा,व्यक्ती विकास आणि सामाजिक बांधिलकी विद्यार्थी जीवनात कशी महत्वपूर्ण आहे या बाबत मार्गदर्शन केले.जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर प्रमाणिकपणा,वक्तशीरपणा,चातुर्य व अभ्यासूवृत्ती हे गूण अंगीकारणे कसे महत्त्वाचे असून महाविद्यालयीन युवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेत तन-मन-धनाने सहभाग घेण्याची गरज व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला प्रा.आरती शेगोकर-कार्यक्रम अधिकारी, प्रा.डॉ.पांडुरंग मिसाळ, प्रा.माणिक कसाब, प्रा.डॉ.छाया जोशी,प्रा.डॉ.राजू शिरसकर,प्रा.शाहूराज येवते,प्रा.यशोदा खुळखुळे,प्रा.प्रेरणा पाटील, प्रा.परमेश्वर भताशे,प्रा.विश्वनाथ व्यवहारे व महाविद्यालयातील सर्व शाखेतील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.परमेश्वर भताशे तर उपस्थितांचे आभार कु.प्रियंका बालचिम हिने मानले.या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.