पद्मभूषण भाऊराव पाटील जयंती सप्ताह उत्साहात सुरु
शबनम न्युज | औंध
स्वावलंबी जीवन जगण्याचा मूलमंत्र आणि शिक्षणाचे जीवनातील अनन्यसाधारण महत्व जनसामान्यांना पटवून मोलाचे कार्य करणाऱ्या पद्मभूषण भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील, रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात, चितळे-तुळपुळे ग्रंथालयाच्या वतीने बुधवार (दि.२८ ) रोजी भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या, पश्चिम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री.शंकरराव पवार यांच्या हस्ते फीत कापून झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे, उपप्राचार्य डॉ.रमेश रणदिवे, ग्रंथपाल प्रा.बद्रीनाथ ढाकणे, डॉ.राजेंद्र रासकर, डॉ. बंडोपंत कांबळे, प्रा.भीमराव पाटील, डॉ.सविता पाटील आदी उपस्थित होते.
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यांनतर श्री. शंकरराव पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी प्रदर्शन स्थळी मांडललेल्या पुस्तकांची पाहणी केली. प्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील, लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या अनेक समाजसुधारकांच्या जीवनावरील प्रेरणादायी पुस्तके, कादंबरी, आत्मचरित्रे, यांच्यासह स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारी पुस्तकेही मांडण्यात आली होती. प्रदर्शन पाहताना विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उस्तुकता दिसून आली.
एकीकडे सोशल मीडियाच्या जमान्यात आजची युवा पिढी पुस्तकांपासून दूर जात असल्याचे चित्र असताना महाविद्यालयात मात्र वेगळेच वातावरण होतं. महाविद्यालयातील तसेच औंध परिसरातील अनेक शाळांतील विद्यार्थ्यांच्या हजेरीमुळे महाविद्यालय ग्रंथमय झाले होते.
या ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्रा. ढाकणे यांच्यासह कार्यालयीन सेवक अनिल मते, रोहन कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी प्रेरणा कांबळे, वैष्णवी बालवडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कर्मवीरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त चालू असणाऱ्या या कर्मवीर जयंती सप्ताहाचा समारोप येत्या शुक्रवारी(ता.१५) औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलामंदिर येथे, आयोजित भव्य व्याख्यानाच्या कार्यक्रमाने होणार आहे. या समारोप समारंभासाठी महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या, उच्च शिक्षण विभागाचे पुणे सहसंचालक, डॉ.किरण कुमार बोंदर, माजी सनदी अधिकारी, चंद्रकांत दळवी साहेब, मा.महापौर. दत्तात्रय गायकवाड, मा.आ.राम कांडके, सदाशिव बापू सातव, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.