शबनम न्युज | मुंबई
शाळेच्या पहिल्या दिवशी आपण सरस्वती देवीची पूजा करतो. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, फातिमा शेख, अण्णासाहेब कर्वे अशा कित्येकांनी आपल्याला शिक्षणाची कवाडं खुली करून दिली. मग त्यांची पूजा का करू नये असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. ज्यांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारी खुले केली, ते देखील आपले देव आहेत. आपल्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रचंड विरोध सहन केला. एवढ्या त्रासातून त्यांनी आपल्याला शिक्षण दिले. त्यामुळे त्यांची पूजा केली पाहिजे, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली.
महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकारण केले जात आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका सपष्टपणे विशद केली.
या विषयाला जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय अशी भूमिका घेणाऱ्यांची छगन भुजबळ यांनी कान उघडणी केली. मी सुद्धा हिंदू आहे असे बोलत अनेक देवस्थानांमध्ये केलेल्या विकास कामांचा दाखला त्यांनी दिला. आपल्यासाठी ज्यांनी शिक्षणाची दारे उघडी केली त्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी बाजूला ठेवणे योग्य नाही, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.