शबनम न्युज | पुणे
महाराष्ट्रात कर्ज ॲपच्या गुन्ह्यांमध्ये अनेक पटीने वाढ झाली आहे. यावर्षी देखील ऑगस्टपर्यंत, कर्ज ॲप ऑपरेटर्स विरुद्ध ३,१५१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस स्टेशनला २०२० मध्ये लोन ॲप गुन्ह्यांच्या ६९९ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर २०२१ मध्ये ही संख्या ९२८ वर पोहोचली होती. यावर्षी देखील कर्ज ॲप गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही पुणे पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात, या महिन्याच्या सुरुवातीला पुण्यातील विमान नगर येथे राहणाऱ्या सोहेल शेख (वय २५) याने कर्ज ॲप द्वारे पैसे घेतले होते. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याला कर्ज ॲप चालकांकडून शिवीगाळ तसेच धमकावले जायचे, या त्रासाला कंटाळून सोहेलने आत्महत्या केली. या प्रकरणी त्याचे वडील जावेद शेख यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
तसेच दुसऱ्या प्रकरणात, वारजे येथे राहणाऱ्या गौरी डांगे हिने स्वतःच्याच ७० वर्षीय आजीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. गौरी हिने ऑनलाईन क्रेडिट प्लॅटफॉर्मवरून कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी तिने आजीचे खून करून ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल व सोनसाखळी लुटली होती. याप्रकरणी पुणे शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणांसह पुणे शहर पोलिसांनी कर्ज ॲप गुन्हांमध्ये अनेक पटींनी वाढ नोंदवली आहे. तसेच या प्रकरणात नऊ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हडपसर येथील एका महिलेंकडून ऑनलाईन खंडणी उकलल्या प्रकरणी कर्नाटकातील बेंगलोर शहरातील बनावट कॉल सेंटर मधून नऊ जणांना अटक करण्यात आले आहे. सायबर पोलिस स्टेशनच्या पथकाने बेंगळुरूला जाऊन २८ सप्टेंबर रोजी विघ्नेश मंजुनाथ (वय.१९), गणेश सुब्बरायडू (वय.२६), आकाश एमव्ही (वय.१९), श्रद्धा गौडा (वय.२५), पार्वती संतोष दास (वय.३९), अश्विनी मुरुगन (वय.२४) , शिल्पा गौडा (वय.२५), प्रिया एस (वय.२३) आणि दीपिका एल (वय.२० ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
पुणे पोलिसांनी सांगितले कि, मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गुगल प्ले स्टोअरवर ऑनलाइन लोन ॲप तयार केले आहे. या कर्ज ॲप द्वारे ऑपरेटर नागरिकांशी फोनवर संपर्क साधतात आणि त्यांना त्यांची ऑनलाइन कर्ज अर्ज डाऊनलोड करण्यास सांगतात. जे लोक कर्ज ॲप डाऊनलोड करण्यासाठी त्यांची माहिती ऑनलाईन सबमिट करतात त्यांच्या सेल फोन मधील गॅलरीमध्ये सेव्ह केलेला संपर्क सूची छायाचित्र आणि व्हिडिओसह हे ऑपरेटर डेटा मध्ये प्रवेश मिळवतात. काही वेळा कर्जासाठी विनंती नसतानाही ऑपरेटर काही रक्कम कर्ज ॲप वापरकर्त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतात. त्यानंतर ऑपरेटर कर्ज ॲप वापरकर्त्यांची छायाचित्रे अश्लील सामग्रीसह मॉर्फ करतात आणि त्यांच्या फोनच्या संपर्क यादीतील लोकांना ते प्रसारित करतात. तसेच कर्ज ॲप वापरकर्त्यांची बदनामी करण्याच्या धमक्या देऊन ऑपरेटर कर्जाची परतफेड म्हणत त्यांच्याकडून ऑनलाइन पैसे उकळतात. तसेच पिढीतांना ऑनलाईन व्यवहाराद्वारे खंडणीचे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यात वर्ग करण्यास भाग पाडले जाते. हे गुन्हे करण्यासाठी लोन ॲप ऑपरेटर्सने फसव्या पद्धतीने मिळविलेल्या अनेक सिम कार्डचा वापर केले जाते, अशी माहितीही पुणे पोलिसांनी दिली आहे. तसेच अशा सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.