शबनम न्युज | पिंपरी
बांधकाम व्यावसायिकास पुनावळे येथील सर्व्हे नं. ५३ /१ मधील ६२.८५ आर जमीन क्षेत्र विकण्याचे कबूल केले. त्यासाठी जमीन मालकांनी विसार रक्कम स्वीकारून विसारपावती केली. परंतु, जमिनीचा पुढील व्यवहार न करता बांधकाम व्यवसायिकाची तब्बल ४२,५०,०००/- रुपयांची आर्थिक तसेच सर्व्हे नं. ५२ /१ मधील क्षेत्र विकसनास न देता फसवणूक केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१९ ते जुन २०२२ या कालावधीत पुनावळे येथे घडला.
याबबत फिर्यादी सागर ओमप्रकाश आगरवाल (वय ३४, रा. मामुर्डी, देहुरोड, ता. मावळ, जि पुणे) यांनी बुधवारी (दि. २८) रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विनोद गोविंद रानवडे, सुरेखा विनोद रानवडे, वैभव विनोद रानवडे (सर्व रा. पुणावळे, ता. मुळशी, जि. पुणे) यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० अन्वये ४०६, ४२०, ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यवसायिक आहेत. जागा विकत किंवा विकसनास घेऊन त्यावर गृहप्रकल्प उभारून त्याची ते विक्री करतात. सर्व्हे नं. ५३/१, पुनावळेतील ६२.८५ आर ही जमीन मिळकत विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती ओळखीतील इकबाल शेख यांच्याकडून फिर्यादीस मिळाली. जमीन मिळकत पसंत पडल्याने फिर्यादी व आरोपींमध्ये फिर्यादीच्या ताथवडेतील कार्यालयात जागेचा व्यवहार ठरला. आरोपींनी १६ लाख प्रती आर दराने जमीन मिळकत खरेदी देण्याचे कबुल केले होते. फिर्यादीने जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२० या दरम्यान फर्मच्या नावाने टी.जे.एस.बी. रावेत शाखेच्या बँक अकाऊंटवरुन आरटीजीएस व्दारे २५,५०,०००/- रुपये व रोख स्वरुपात १७,००,००० /- रुपये अशी एकुण ४२,५०,००० रुपये खरेदीखताच्या व्यवहारासाठी विसार रक्कम दिली. विसारपावतीवर आरोपींच्या सह्या होऊन विसारपावती झाली आहे. मिळकतीची विसारपावती फिर्यादी व मोहन शिवाजी राऊत यांच्या नावे आहे. कोरोनामुळे पुढील २ ते ३ महिने व्यवहार झाला नाही. मे २०२० मध्ये फिर्यादीने आरोपींना खरेदीदस्त नोंदणीसाठी विचारणा केली.
मात्र,आरोपींनी खोटी कारणे देत टाळाटाळ केली. आरोपींनी फिर्यादीसोबत ठरलेला व्यवहार टाळुन इतर इसमांकडुन मिळकतीच्या मोबदल्यात रक्कम स्विकारल्याची माहिती फिर्यादीला समजली. याबाबत फिर्यादीने आरोपींना नोटीस पाठविली. त्यानंतर सल्लामसलत होऊन फिर्यादी व आरोपींची बैठक झाली. त्यात आरोपींनी फिर्यादीस सर्व्हे नं. ५३/१ ही मिळकत ठरल्याप्रमाणेच देण्याचे कबूल केले. सोबतच आरोपींच्या मालकीची पुणावळे येथील दुसरी मिळकत सर्व्हे नं. ५२/१ विकसनास देण्याचे ठरले. त्यानुसार सर्व्हे नं. ५२/१ ही मिळकत प्रति गुंठा ६५० चौ. फुट याप्रमाणे बांधकाम मोबदला व प्रति गुंठा २ लाख रुपये रिफंडेबल डिपॉझीट देण्याबाबत व्यवहार ठरला. आरोपींनी दोन्ही जागेचा व्यवहार एकाच वेळेस करायाचा आहे, असे सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर आरोपींनी विकसनास देवु केलेल्या सर्व्हे नं. ५२/१ या जमिनीच्या ७/१२ उता-यावर आरोपींचे नावच नसल्याचे फिर्यादीला समजले. आरोपींकडे विचारणा केली असता काही तांत्रिक कारणामुळे ७/१२ उता-यावरील नाव कमी झाले आहे, त्यासाठी तहसिलदार, मुळशी यांच्याकडे अर्ज केला आहे, असे खोटे सांगितले. आरोपींकडून समाधानकारक उत्तर न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.