डॉ.आंबेडकर महाविद्यालयात ‘कर्मवीर जयंती’ सप्ताह संपन्न
शबनम न्युज | औंध
“मी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटलांनी उभ्या केलेल्या रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊ शकलो, याचा मला नितांत अभिमान आहे. ‘रयत’ने माझ्यासारखे अनेक विद्यार्थी घडविले. ‘कमवा व शिका’ योजनेच्या माध्यमातून कर्मवीरांनी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना ‘स्वाभिमान’ दिला.” असे मत माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या, येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातर्फे पं.भीमसेन जोशी कलामंदिर येथे, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘कर्मवीर जयंती सप्ताहाच्या’ समारोप समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पुणे उच्च शिक्षण मंडळाचे सहसंचालक डॉ.किरणकुमार बोंदर, मा.आ.राम कांडके, मा.महापौर. दत्तात्रय गायकवाड, सदाशिव सातव, प्राचार्य.डॉ.अरुण आंधळे, भास्कर हांडे, विकास रानवडे, शंकरराव पवार, डॉ.रमेश रणदिवे, सुर्यकांत सरवदे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
दळवी बोलताना पुढे म्हणाले, “ज्या महामानव डॉ.आंबेडकरांच्या नावाने हे महाविद्यालय आहे, त्यांच्या नावाला शोभेल असा प्रत्येक विद्यार्थी येथून घडावा यासाठी आपला प्रयत्न हवा.
“पुणे उच्च शिक्षण मंडळाचे सहसंचालक डॉ.किरण कुमार बोंदर यावेळी बोलताना म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या कमवा आणि शिका योजनेमुळे मी शिक्षण स्वाभिमानाने घेऊ शकलो. त्यांनी दाखवलेला शिक्षणाचा मार्ग अवलंबल्यामुळेच मी माझ्या जीवनात यशस्वी झालो.”
मा.आ. राम कांडके यांनी आपल्या भाषणात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू प्रसंगांच्या माध्यमातून उलगडले. ते म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटलांनी विद्यार्थ्यांना नुसते शिक्षण दिले नाही, तर त्यांनी ‘कमवा व शिका’ योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वाभिमानाने शिक्षण घेण्याचा अधिकार दिला.”
पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांनीही यावेळी भाषण केले. ते म्हणाले, “कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेल्या, या रयत शिक्षण संस्थेने आजवर अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांच्यामुळे आज भारतात असे एकही क्षेत्र नाही जिथे रयतचा विद्यार्थी स्वाभिमानाने काम करत नाही.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्राचार्य डॉ.आंधळे यांनी तर, आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.प्रभंजन चव्हाण यांनी मानले. तर डॉ.सविता पाटील यांनी सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.भिमराव पाटील, डॉ.बंडोपंत कांबळे, डॉ.देवकी राठोड, डॉ.राजेंद्र रासकर, प्रा.कुशल पाखले, प्रा.कल्पना कांबळे, प्रा.चंद्रकांत बोरुडे, प्रा.कल्याणी सोनवणे यांनी विशेष मेहनत घेतली.