शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या अकार्यक्षमतेविरोधात रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने या अनेक मुद्द्यावर आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
मुद्दे –
१) अनाधिकृत शाळा –
पिंपरी चिंचवड शहारात कसल्याही प्रकारची परवानगी न घेता १)ज्ञानराज माध्यमिक शाळा ( कासारवाडी ) २) मॉडर्न पब्लिक स्कुल ( रहाटणी ) ३) मास्टर केअर इंग्लिश स्कुल ( भोसरी ) ४) ग्रँट मीरा इंग्लिश स्कुल ( चिखली ) ५) एस. एस. स्कुल फॉर किड्स (सांगवी), ६) साई स्कुल ऑफ एक्सलेन्स ( पिंपळे सौदागर ) ७) सेंट रोझरी इंग्लिश मिडीयम स्कुल (चिखली) ८) माने इंग्लिश स्कुल ( राजवाडेनगर,काळेवाडी )
या अनाधिकृत शाळा राजरोसपणे अनेक वर्षांपासून चालू आहेत.या शाळा विद्यार्थी व पालकांचे आर्थिक शोषण करतात.अनधिकृत शाळेत शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .या अनधिकृत शाळांवर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार अनाधिकृत शाळांना १ लाख रुपये दंड मारावा व त्यानंतर देखील शाळा चालू ठेवल्यास प्रतिदिन १० हजार रुपये दंड आकारण्यात यावा व पुढील ८ दिवसाच्या आत दंड वसूल न झाल्यास शिक्षण संचालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे.
२) शैक्षणिक तक्रारींचे निवारण
पिंपरी चिंचवड शहरात अनुदानित,खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात आहेत.शहरातील अनेक शाळा नियमबाह्य पद्धतीने काम करतात.विदयार्थ्यांची आर्थिक लूट करणे,शाळा सोडल्याचे दाखले अडवणे,फीस अभावी परीक्षेला बसू न देणे, RTE मधील विद्यर्थ्यांकडून पैसे घेणे,त्यांचे वेगळे वर्ग करणे,त्यांना हींन वागणूक देणे अश्या अनेक शैक्षणिक तक्रारी शिक्षण विभागास येत असतात परंतु तक्रार केल्यावर त्या तक्रारींचे निवारण होत नाही सामाजिक शैक्षणिक संस्था संघटनांच्या निवेदनाला शिक्षण विभागाकडून उत्तरे दिली जात नाहीत.शिक्षण विभागाच्या या अकार्यक्षमतेमुळे खाजगी शाळांची मुजोरी वाढत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी वेळेवर सोडवल्या न गेल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते.यासंदर्भात तक्रार निवारण कमिटी नेमण्यात यावी.
३) महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत गांभीर्य नाही.
दरवर्षी शाळा चालू होतात आणि दरवर्षी सामाजिक शैक्षणिक संस्थांना महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करावे लागते . शाळा चालू होऊन ३ ते ४ महिने उलटून सुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळत नाही. न्यायालयीन प्रकरण असल्याचे सांगून वेळ मारून नेली जाते.जर विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक साहित्य मिळत नसेल तर मराठी शाळांची पटसंख्या कशी टिकून राहील ? महापालिकेतील विद्यार्थ्यांना हिवाळ्यात रेनकोट आणि पावसाळ्यात स्वेटर मिळतात असा हा अनागोंदी कारभार चालू आहे. या प्रश्नासंदर्भात कायमचा तोडगा काढला पाहिजे.
४) महापालिकेच्या २१ शाळा मुख्याध्यापकांविना
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २१ शाळा मुख्याध्यपकांविना सुरु आहेत. मुख्याध्यापक पदांसाठी शिक्षक पात्र असून देखील केवळ सेवा जेष्ठता यादीला उशीर झाल्याने त्यांना पदोन्नती मिळविलेली नाही. याचा थेट परिणाम कामकाजावर होताना दिसून येत आहे. कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्याने शाळांचा कारभार इतर वरिष्ठ शिक्षकांच्या खांद्यावर आहे.परंतु क्षमता असूनही आवश्यक निर्णय घेता येत नसल्याने शाळांची गुणवत्ता कशी सुधारणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे चित्र आहे.
या शैक्षणिक तक्रारी संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आउट गेट समोर चालू असलेल्या उपोषण स्थळी येऊन शिक्षण अधिकारी मा. संजय नाईकडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. व सर्व तक्रारी जाणून घेऊन या सर्व तक्रारींची चौकशी समिती नेमून या तक्रारी सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.व उपोषणकर्ते प्रदेश महासचिव संतोष शिंदे व पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मयूर जगताप यांना पाणी पाजून उपोषण सोडवले.
पुढील १५ दिवसात आमच्या शैक्षणिक प्रश्नांवर योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास आम्ही या प्रश्नांसंदर्भात परत अधिक तीव्रतेने लढा देऊ असे मत प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,प्रदेश सहसचिव भाग्यश्री आखाडे,मावळ तालुका प्रमुख अतुल वाघमारे,पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष योगेश कांबळे,सदस्य गाझी शेख,सदस्य करण शिंदे,सदस्य श्रीयश कदम तसेच जेष्ठ नेते मानव कांबळे,बाबा कांबळे,गौरव जाधव,शिवशंकर उबाळे,भैयासाहेब गजधने,प्रकाश बुक्तर,अरु लोंढे,शंकर शिंदे आदी उपस्थित होते.