शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड ते पुणे शहरात दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी पुणे मेट्रोने खूशखबर दिली आहे. अखेर पुणे मेट्रो पिंपरी ते शिवाजीनगर धावण्याच्या तयारीत असल्याचे पुणे मेट्रोच्या वतीने सांगण्यात आले आहे. महा मेट्रो फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय, शिवाजीनगर स्थानकापर्यंत धावणार असल्याच्या तयारीत असल्याची माहिती महा मेट्रोचे प्रवक्ते हेमंत सोनवणे यांनी शुक्रवारी दिली.
महा मेट्रोने २० नोव्हेंबरपासून ट्रायल रन करण्याची योजना आखली आहे आणि त्यानंतर ही सेवा चालवण्यासाठी सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे ही सोनवणे यांनी सांगितले.
ते म्हणाले, “पिंपरी ते फुगेवाडी मार्गावरील मेट्रो सेवा आधीच सुरळीत सुरू आहे. आता, आम्ही मेट्रो सेवा दिवाणी न्यायालयापर्यंत विस्तारण्याची योजना आखत आहोत जी पिंपरी ते पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचे ठरेल. प्रथम, आम्ही फुगेवाडी ते दिवाणी न्यायालयात १० दिवस तांत्रिक चाचणी चालवण्याची योजना आखत आहोत. त्यानंतर, आम्ही वैधानिक मंजुरीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांना अहवाल पाठवू. त्यानंतर ते या विभागावरील सेवेची तपासणी करतील. त्यांच्या ग्रीन सिग्नलनंतर, आम्ही सरकारकडून सेवेच्या उद्घाटनासाठी हिरवा सिग्नल घेऊ,” असे ते म्हणाले.