काळेवाडी भागात रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात थेरगाव परिसरातील काळेवाडी भागात रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. मनपा वतीने वारंवार सांगूनही येथील नागरिक कचरा रस्त्यावर फेकून जातात. विशेष म्हणजे मनपाने त्या ठिकाणी आदेश बोर्ड लावून कचरा व राडारोडा फेकण्यास मनाई केली परंतु येथील नागरिक तरीही त्या ठिकाणी कचरा व राडारोडा करत आहे. रस्त्यावरच कचऱ्याचे साम्राज्य असल्याने तेथील रहिवाशांना, ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो. या कचऱ्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा ही प्रश्न निर्माण होतो, असे असतानाही येथील नागरिक कचरा व राडारोडा करण्यास काही कमी करत नाही. आता अशा नागरिकांच्या बेजबाबदार पणाला ‘जबरदस्ती’ ची कचराकुंडी ही म्हणता येईल.
कचऱ्याची विल्हेवाट होण्याकरिता मनपा वतीने दररोज कचरा गाडी शहरात फिरते. मनपाने नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळे करण्याचे आवाहन ही केलेले आहे. परंतु नागरिक काही कचऱ्याची व्यवस्था व्यवस्थित करताना दिसत नाही. तसेच कचरा गाडी येत असताना देखील कचरा हा रस्त्यावर फेकला जातो. हे अत्यंत दुर्देवी आहे. एकीकडे पिंपरी चिंचवड शहर हे ‘स्मार्ट सिटी’ कडे वाटचाल करत असताना, जागोजागी कचरा रस्त्यावर फेकलेला असतो. सकाळी बाहेर पडल्यानंतर कचऱ्याचे दर्शन होत असल्याने येथील नागरिक ही नाराजी व्यक्त करीत आहे. स्मार्ट सिटीचे बिरुद मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात कचऱ्याचा प्रश्न सतावतो आहे. रस्त्यावर कचरा जमा होणार नाही याची दक्षता महापालिका घेताना दिसते. पण नागरिक या कडे दुर्लक्ष करून रस्त्यावर कचरा फेकतात. मनपा वतीने साफ-सफाई कर्मचारी शहरातील रस्ते स्वच्छ ठेवतात. परंतु नागरिक याच रस्त्यावर कचरा फेकून जातात. शहरात प्रदूषण वाढत असताना दुसरीकडे कचऱ्याची समस्या डोके वर काढत असते.
प्रशासन वारंवार स्वच्छ शहर ठेवण्याचे आवाहन करते, परंतु नागरिक हे निर्लज्ज पणे कचरा रस्त्यावर टाकतात. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ ही अभिनव योजना राबविली जात असताना, थेरगाव परिसरातील नागरिकांकडून कचऱ्याचे साम्राज्य निर्माण केले जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मनपाने अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांच्या वतीने होत आहे.