शबनम न्युज | मुंबई
पतंजलीचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. याचवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट करत रामदेव बाबावर निशाणा साधला आहे. त्यांनी गाडगेबाबा आणि रामदेव बाबा यांची तुलना करून ‘कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा?’ असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रात तुकोबा ते गाडगेबाबा अशी संतांची सुसंस्कृत परंपरा आहे. रामदेव बाबांनी आज स्त्रियांचा अपमान केला असून परंपरेला तडा दिला. असे अमोल मिटकरी यांनी म्हंटले आहे.
ते म्हणाले, “कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा? महाराष्ट्रात तुकोबा ते गाडगेबाबा अशी संतांची सुसंस्कृत परंपरा आहे. आज रामदेव बाबांनी स्त्रियांचा अपमान करून या परंपरेला तडा दिला आहे. “छाटी भगवी मानसी ! व्यर्थ म्हणे मी संन्यासी !तुका म्हणे तोचि वेडाl त्याचे हाणूनी थोबाड फोडा ll.” असे ट्विट करत अमोल मिटकरी यांनी रामदेव बाबांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
काय म्हणाले रामदेव बाबा –
आज पतंजलीच्या मोफत योग शिबिरात रामदेव बाबा बोलत होते. यावेळी बोलताना महिलांविषयी संतापजनक वक्तव्य त्यांनी केले. ते म्हणाले, ‘महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार-सुटमध्येही(पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, काही घातले नाही तरी छान दिसतात.’ विशेष म्हणजे, त्यावेळी मंचावर त्यांच्या शेजारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदें उपस्थित होते. यांनतर रामदेव बाबानी अमृता फडणवीस यांचे कौतुक देखील केले.
ते म्हणाले, अमृता फडणवीस हिशोबात अन्न ग्रहण करतात. पुढील शंभर वर्षे त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. याचे कारण म्हणजे त्या नेहमी आनंदी राहतात, असे बाबा रामदेव म्हणाले. तसेच जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर असतो, तसाच आनंद मला तुमच्या (उपस्थित महिला) चेहऱ्यावर पाहायचा आहे, असेही त्यांनी म्हटले.