शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
“भारतीय संविधानाने प्रदान केलेल्या विविध हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव नागरिकांनी ठेवायला हवी!” असे विचार पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यांनी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित खिंवसरा- पाटील शैक्षणिक संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे शनिवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी व्यक्त केले.
संविधानदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती सचिव ॲड. सतीश गोरडे होते; तर पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, ॲड. अक्षय केदार, ॲड. सौरभ जगताप यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी बालवर्गातील विद्यार्थ्यांनी सभाधीटपणे केलेल्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.
पाचवीच्या विद्यार्थ्यांनी गीतांमधून संविधानाला मानवंदना दिली; तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सार्वभौमत्व, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, गणराज्य पद्धती या मूलभूत तत्त्वांची प्रतीके परिधान करून त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. त्यानंतर उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी विविध क्रीडास्पर्धांमधील छोट्या, मध्यम आणि मोठ्या गटातील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. ॲड. जयश्री कुटे यांनी “ए मेरे वतन के लोगों…” या गीताचे सुरेल सादरीकरण केले. अध्यक्षीय मनोगतातून ॲड. सतीश गोरडे यांनी घटना समिती, मसुदा समिती, संविधानाच्या निर्मितीसाठी लागलेला कालावधी याविषयी सविस्तर माहिती देऊन, “विद्यार्थिदशेत संविधानाचा अभ्यास केला; तर आदर्श नागरिक म्हणून भावी काळात योग्य वाटचाल करता येईल!” असे मत व्यक्त केले. आशा हुले, स्मिता जोशी, गणेश शिंदे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. वीणा तांबे यांनी प्रास्ताविक केले. सीमा आखाडे यांनी सूत्रसंचालन केले. नटराज जगताप यांनी आभार मानले.