शबनम न्युज | ठाणे
भारतीय संस्कृतीमध्ये आपण स्त्रीचे आदिशक्ती आणि देवी म्हणून पूजन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमिमध्ये आपण स्त्रीचा सन्मान राखणे हे आपले आद्य कर्तव्य समजतो. ठाण्यामध्ये रामदेव बाबा यांनी तमाम माता-भगिनींच्या पोशाखाबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केले ते अत्यंत निंदनीय होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा जाहीर निषेध करते, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केली.
हे त्यांच्या मानसिक विकृतीचे प्रदर्शन घडवणारे वक्तव्य होते. याच्यापेक्षा सर्वात धक्कादायक बाब आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे अमृताताई फडणवीस त्यांच्या बाजूला बसलेल्या असताना तसेच अनेक माता भगिनी समोर बसलेल्या असताना काल त्यांनी निंदनीय वक्तव्य केले. मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा रामदेव यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली.
माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाणे पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. निदान आतातरी ठाणे पोलिसांनी धारिष्ट दाखवावे की, बाबा रामदेव यांच्यावर विनयभंगाचा ३५४ ड अंतर्गत गुन्हा नोंदवावा, असेही आनंद परांजपे म्हणाले.