शबनम न्युज | मुंबई
रामदेव बाबा यांनी महिलांच्या कपड्यांवरून केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सर्वच स्तरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. आता बाबा रामदेव यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.
बाबा रामदेव यांच्या वक्तव्यानंतर महिला आयोगांकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच त्यांना दोन दिवसांमध्ये यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. दरम्यान, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बाबा रामदेव यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचे पत्र ट्विट केलं आहे.
पत्रात म्हटले आहे कि, “बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती ,याबाबतीत त्यांचा खुलासा आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी माफी मागितली आहे,” असं ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
माफी नाम्यात बाबा रामदेव म्हणाले कि, “महिलांना समाजात मानाचे स्थान मिळावे यासाठी मी नेहमीच महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे. केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ उपक्रमांतर्गत विविध धोरणांना मी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. यावरून हे स्पष्ट आहे की माझा महिलांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि सोशल मीडियावर आलेली क्लिप संदर्भाबाहेरील आहे,” असं बाबा रामदेव यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हंटले आहे.