पिंपरी चिंचवड महापालिका, बानाई, रयत विद्यार्थी विचार मंच आणि संविधान संवादक चळवळीचा उपक्रम
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिके च्यावतीने दि. २६ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत शासनाच्या सूचनांनुसार शहरात “संविधान संवाद अभियान” उपक्रम राबविण्यात येत आहे. बानाई, रयत विद्यार्थी विचार मंच आणि संविधान संवादक चळवळ यांच्या सहकार्याने सूरू असलेल्या या उपक्रमाद्वारे पथनाटय, गीत सादरीकरण तसेच शाळा, महाविद्यालय, मंदिर, मस्जित अशा विविध ठिकाणी विद्यार्थी नागरिकांसोबत संवाद साधून संविधानाचे महत्व पटवून देण्यात येत आहे.
भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय तसेच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जा संधीची समानता प्राप्त करून देण्याच्या अनुषंगाने व सर्वांना संविधानाची होण्यासाठी ओळख राज्यात दरवर्षी दि. २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यादृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आणि बानाई, रयत विद्यार्थी विचार मंच, लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र यांच्या सहकार्याने संविधानाला अपेक्षित नागरिक घडवण्यासाठी संविधान मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यात येत आहे.
संविधान दिनाचे औचित्य साधून दि. २६ रोजी संत तुकारामनगर, गांधीनगर, फुले नगर, विठठल नगर, बालाजी नगर या परिसरात, दि. २७ रोजी कासारवाडी, दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख तसेच दि. २८ रोजी भोसरी, मोशी, चिखली, आकुर्डी, निगडी से.२२, तळवडे, रुपीनगर या भागात संविधानाचे महत्व पटवून देणारे उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये, शहरात विविध ठिकाणी लोककला, पीपीटी, गाणी, गप्पा, गोष्टी, चालता बोलता संविधान अशा अनेक माध्यमातून सोप्या भाषेत संविधानाची मूल्ये सादर करण्यात येत आहे. यातून प्रत्येकाचा संविधान आणि आपल्या आजूबाजूला घडणा-या घटनांकडे बघण्याचा संविधानिक दृष्टीकोन विकसित होण्यात मदत होणार आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात संविधानाबद्दल असलेला आदर आणि निष्ठा वाढीस लावून सार्वभौम राष्ट्र बळकट करण्यासाठी संविधानाचा जागर महत्वपूर्ण ठरत आहे. संवाद अभियान दि. २६ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये शहरातील विविध भागांमध्ये राबविण्यात येत असून या उपक्रमात शाळा / महाविद्यालय / सामाजिक संस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.